आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे याचा उलगडा यथावकाश होईलच. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मते, पवार यांच्या मनात नेमके काय आहे, हे सांगणे तसे कठीणच. तरीही गेल्या काही दिवसांतील हालचाली आणि त्यातून पवार यांची व्यक्त झालेली अस्वस्थता यातून त्यांनी खालील पाच कारणे त्यामागे असू शकतात....
शरद पवारांनी राजीनामा नाट्यातून साधल्या या पाच बाबी, संघटना पवारांबरोबर असेल तर पक्ष सोडून भाजपत जाणारे आमदार दहा वेळा विचार करतील.
भाजपशी युतीसाठी दबाव
भाजपशी युती करून सत्ता मिळवावी, या मुद्द्यावर राष्ट्रवादीत दोन विचार आहेत आणि त्यातून अंतर्गत अस्वस्थता, विशेषत: अनेक आमदारांच्या मनाची चलबिचल शरद पवार यांना अस्वस्थ करत होती. बहुतांश आमदारांचे तेच मत आहे, असे सांगून त्यांच्यावर दबाव वाढवला जात होता. त्यामुळे उद्विग्न होऊन ‘मीच अध्यक्षपद साेडतो, त्यानंतर तुम्हाला वाटेल ते करा,’ अशा भूमिकेपर्यंत पवार आले असावेत.
उत्तराधिकाऱ्याबाबत कौल
नवीन नेतृत्वाबाबत काय प्रतिक्रिया येतात, हेही पवारांनी या निर्णयाच्या माध्यमातून तपासून पाहिले असावे. आपल्यानंतर कुणी पक्ष सांभाळावा, असे संघटनेतील नेत्यांना वाटते, कुणाला स्वीकारायची त्यांची तयारी आहे हे या निमित्ताने शरद पवार यांनी समजून घेतले आहे. त्यामुळे भविष्यात आपला उत्तराधिकारी ठरवताना त्यांना योग्य निर्णय घेणे या घटनांमुळे सोपे झाले आहे.
बंडखोरी रोखण्यात यश
राष्ट्रवादीतील संभाव्य बंडाळी रोखण्यातही शरद पवार यांना राजीनामा नाट्यामुळे यश आल्याचे काही नेत्यांना वाटते आहे. पक्षाचा तळातला कार्यकर्ता आणि एकूणच संघटना शरद पवारांबरोबर असेल तर पक्ष सोडून भाजपत जाणारे आमदार दहा वेळा विचार करतील.
नेतृत्वाचा खुंटा बळकट केला
संघटनेला अाजमावून पाहणे हादेखील पवारांचा हेतू असू शकतो. उद्या पक्षात फूट पडली तर पक्षाचा शेवटच्या स्तरावरचा कार्यकर्ता नेमका कुणाबरोबर असेल हे या कृतीतून पवार यांनी तपासून घेतले आहे. उद्या शिवसेनेसारखी फूट पडलीच तर पक्षसंघटना आपल्या विचारांबरोबर असेल हे त्यांना या राजीनामा नाट्यातून समजले आहे आणि त्यामुळे ते निश्चिंत होऊन पुन्हा पद स्वीकारण्याच्या मन:स्थितीत आले असावेत.
प्रतिमा जपण्याचा झाला प्रयत्न
२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार बनवत असताना अजित पवार यांनी अचानक करवून घेतलेला पहाटेचा शपथविधी पवार यांच्या जिव्हारी लागला होता. त्या वेळी आमदारांना परत आणण्यात यश तर आले होते; पण आता संपूर्ण पक्षानेच भाजपबरोबर जाण्याचा आग्रह सुरू होता. तसे झाले तर पवार यांची प्रतिमा बिघडेल आणि २०२४ च्या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांनाच खीळ बसेल. या कारणामुळे जबाबदारीच्या पदापासून दूर होण्याचा निर्णय पवारांनी घेतला असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.