आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी (ता. 2) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तेव्हा सभागृहातच आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करून जोरदार घोषणाबाजी केली. अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना तर अश्रूही अनावर झाले. अखेर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी 2-3 दिवसांचा वेळ द्या, अशी समजूत शरद पवारांनी घातली.
सध्या शरद पवारांनंतर पक्षाचा अध्यक्ष कोण यावर मंथन आणि बैठका सुरू आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी आणि अजित पवारांकडे राज्याची जबाबदारी, असे धोरण ठरल्याचे समजते. मात्र, याची घोषणा अजून नाही.
LIVE
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे मला आता वाटते असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केला असताच. आता आपण ६ मे रोजीची बैठक ५ मे रोजीच घ्या. समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांना एक प्रकारचा दिलासा दिला आहे.
- शरद पवारांचा राजीनामा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. बैठक आणि इतर निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाईल. अफवा पसरवू नका, प्रफुल्ल पटेल यांचे आवाहन.
- राष्ट्रवादी काँग्रेसची आजच कुठलिही बैठक झाली नाही. शरद पवारांनी दोन दिवसांची वेळ मागितली आहे. आजचा दिवस जाऊ द्या, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
- प्रसारमाध्यमांनी मला मुंबईत बैठक असल्याचे सांगितले. मात्र, सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा मुंबईत कसलिही बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. आता सायंकाळी बैठक आहे. मी तिकडे जाणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
- आजच्या बैठकीला मला बोलावण्याची गरज वाटली नसेल. सगळ्या ठिकाणी आपण असावे, असा आग्रहही धरू नये. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया.
- मुंबईतल्या पक्षाच्या बैठकीची मला माहिती नव्हती. त्यामुळे मी पुण्यातल्या साखर संकुलातील बैठकीला आलो होतो. या बैठकीनंतर मी मुंबईला जाणार आहे.
- शरद पवारांनी राजीनाम्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. के. के. शर्मा यांनी घातले साकडे. कार्यकर्त्यांना तुमची गरज असल्याचे केले आवाहन.
- यशवंतराव चव्हाण केंद्रातील बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड अनभिज्ञ असल्याचे आले समोर.
- शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन. यशवंतराव चव्हाण केंद्रातील बैठकीला बोलावले. पाटील सायंकाळी पाचपर्यंत मुंबईत पोहचण्याची शक्यता.
- जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले पक्षाचे राजीनामे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक. शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, हेमंत टकले उपस्थित.
- शरद पवार हे पुन्हा यशवंतराव चव्हाण सभागृहात आले आहेत. शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळेदेखील आहेत. येथे दुपारी 1 वाजेपर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. आपण जाहीर केलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निर्णयाबाबत शरद पवार कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर. बैठकीत चर्चा सुरू. सुप्रिया सुळे दिल्लीत आणि अजित पवार राज्याचे नेतृत्व करण्याची शक्यता.
- अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावर पक्षातील नेत्यांची बैठक. यामध्ये शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीवर चर्चा होईल. बैठकीबाबतचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही.
- शरद पवार निवृत्तीच्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
- शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर आज सकाळपासून मनधरणी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची रीघ लागली आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहे.
- शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. काल रात्रीपर्यंत शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू होती. निवृत्तीच्या निर्णयापासून माघार घेणार नसल्याचे संकेत शरद पवारांनी या बैठकीतही दिले.
- राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांची पवारांच्या घरी काल सुमारे दोन तास बैठक झाली. या सर्वांनी पवारांना निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनवणी केली. हवे तर कार्याध्यक्ष नेमा पण आपण पक्षाध्यक्ष राहा, असे या नेत्यांनी आवाहन केले. पण पवार निर्णयावर ठाम राहिले. पदाधिकारी उपोषण, राजीनाम्यावर ठाम असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर मीही तितकाच हट्टी असल्याचे त्यांनी सांगितले.
- शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. साहेबांनी राजीनामा मागे न घेतल्यास सामूहिक राजीनामे देणार, असा ठराव सोलापूर राष्ट्रवादीने केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
- शरद पवारांनी निर्णय मागे न घेतल्यास जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामे देतील. राष्ट्रवादीचे काम करणार नाही, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पुणे व जळगाव येथील काही कार्यकर्त्यांनी तर रक्ताने पत्र लिहित शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे.
संबंधित वृत्तः
लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन
पुनरावृत्ती:शरद पवारांमुळे शिवसैनिकांना आठवला बाळासाहेब ठाकरेंचा राजीनामा, कार्यकर्त्यांमुळे घ्यावा लागला होता निर्णय मागे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल अचानक आपण निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहिर केला. आणि एरव्ही भक्कम वाटणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. यावेळी शिवसैनिकांना 45 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कशी परिस्थिती ओढवली होती. त्या घटनेची आठवण झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शेकडो शिवसैनिकांनी 'मातोश्री'कडे धाव घेत आक्रोश केला होता. शिवसैनिकांनी भर पावसात मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांच्या भावनांचा आदर राखत आपली निवृत्तीची घोषणा मागे घेतली होती. आता असेच काहीसे शरद पवार यांच्याही बाबतीत घडते की काय याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.