आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केमछो!:शरद पवार-अमित शहा भेटीने महाराष्ट्रात राजकीय बोंबाबोंब, अमित शहा म्हणतात.. सर्व गोष्टी सार्वजनिक करण्यासाठी नसतात

अहमदाबाद,मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दिव्य भास्कर’चा गौप्यस्फोट : अदानी शांतिग्राम विश्रामगृहावर खलबते

महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी अहमदाबादेत भेट झाली. ‘दिव्य मराठी’चे गुजराती भावंड ‘दिव्य भास्कर’ने या गोपनीय भेटीचे वृत्त गुजरातेत देताच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने उभय नेत्यांमधील भेटीचा तातडीने इन्कार केला. मात्र ‘सर्वच गोष्टी सार्वजनिक करण्यासाठी नसतात’ असे सूचक वक्तव्य अमित शहा यांनी केल्याने या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण अाले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले १०० कोटी वसुलीचे आरोप, अँटिलिया स्फोटकांचे प्रकरण आणि खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे. डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याचे नाव असून या पार्श्वभूमीवर पवार आणि शहा यांच्या बैठकीला महत्त्व प्राप्त होते.

पवार अहमदाबादला गेले, मात्र कुणालाही भेटले नाहीत : राष्ट्रवादी
मुंबई | शरद पवार, प्रफुल्ल पटेल अहमदाबादला गेले हे मान्य करतानाच गृहमंत्री अमित शहा यांना भेटले नाहीत,असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला अाहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी या भेटीचे खापरही भाजपवर फोडले. भेटीचे वृत भाजपने पसरवलेली अफवा असल्याचे ते म्हणाले. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते अहमदाबाद येथून एकत्र आले होते. पण, ते कुणालाही भेटले नाहीत, असे मलिक म्हणाले. गुजरातीमध्ये ‘केम छो’ (काय चाललंय) अशा शब्दांत एकमेकांची विचारपूस केली जाते.

शहांना सुचवायचे होते ते सुचवले : भाजप
अमित शहा यांना जे सुचवायचे होते ते सुचवले, अशी पहिली प्रतिक्रिया भाजपकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ठाकरे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही. आघाडीतील घालमेल बाहेर येत आहे. केवळ नशिबाच्या जोरावर फार काळ सरकार चालवता येत नाही, अशा कानपिचक्या दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या.

‘दिव्य भास्कर’चा गौप्यस्फोट : अदानी शांतिग्राम विश्रामगृहावर खलबते
गांधीनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे विश्वासू माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादेतील अदानी शांतिग्राम विश्रामगृहावर शनिवारी गुप्त भेट झाली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता शरद पवार अाणि प्रफुल्ल पटेल एका खासगी जेट विमानाने अहमदाबादला पोहोचले. तेथील अदानी शांतिग्राममधील एका विश्रामगृहावर मुक्काम केला. त्यानंतर सकाळी अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विशेष म्हणजे नियोजित शासकीय कार्यक्रमानुसार अमित शहा रविवारी अहमदाबादला पोहोचणार होते, परंतु ते शुक्रवारी सायंकाळी उशिरा अहमदाबादेत दाखल झाले. शनिवारचा त्यांचा पूर्ण दिवस राखीव होता. म्हणजेच राष्ट्रवादीच्या नेत्यांव्यतिरिक्त ते गुजरात भाजपमधील एकाही नेत्याला भेटले नाहीत.

पवारांच्या यूपीए नेतृत्वाचे तुणतुणे : वाझे प्रकरण तापले असताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, असे वक्तव्ये करून आधी काँग्रेसला चुचकारले. रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रातील लेखामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही टीका करून राष्ट्रवादी काँग्रेसलाही डिवचले. राष्ट्रवादी-भाजप यांच्यातील जवळीक वाढल्यानेच राऊत यांनी पवारांच्या यूपीए नेतृत्वाचे तुणतुणे लावल्याचे दिसत आहे. या घडामोडींमुळे आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...