आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरहरी झिरवळ आणि शरद पवारांची चर्चा:भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनावर तोडगा काढण्यासाठी आघाडीत चर्चा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बुधवारी (ता.१२) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्याने निलंबन प्रश्नी तोडगा काढण्याबाबत आघाडी सरकारमध्ये विचारविनिमय सुरू अाहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याच्या मुद्यावरून भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. या बारा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी सुनावणी दरम्यान एक वर्षांच्या निलंबनाच्या निर्णयाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पुढील सुनावणी १८ जानेवारी रोजी होईल. दुसरीकडे निलंबनाचा कालावधी कमी करण्यासाठी या बारा आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पत्राव्दारे विनंती केली आहे.

निलंबन मागे घेण्याबाबत तांत्रिक पेच
१. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ विधानसभा क्षेत्र प्रतिनिधीत्वाशिवाय रिक्त ठेवता येत नाही, यावर बोट ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ निलंबन योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाच्या विरोधात निवाडा दिल्यास महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर जाऊ शकते.
२. निलंबन सभागृहाने केलेले आहे, त्यामुळे सभागृहाच्या बाहेर किंवा अधिवेशन चालू नसताना निलंबन मागे घेता येत नाही. त्यामुळे निकालापूर्वी कारवाई मागे घेण्याच्यादृष्टीने काय मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.