आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबा-नातू वाद:महाराष्ट्राचं महाभारत नव्या वळणावर : पार्थचा बाण वर्मी लागला? राजी-नाराजीच्या बैठका!

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित, सुनेत्रा व पार्थची आज काका श्रीनिवास यांच्याशी चर्चा

पार्थ यांनी राम मंदिरप्रश्नी घेतलेली पक्षविरोधी भूमिका; यामुळे शरद पवार यांनी टोचलेले कान,त्यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र सुरूच आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांना भाजपने बिहार निवडणुकांचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्याची चर्चा असल्याने राज्याचे महाभारत नव्या वळणावर आलेय.

चव्हाण सेंटरवर खलबते : सारे काही आलबेल असल्याचे दाखवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक नेत्यांची रीघ लागली होती. बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राज्यमंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुप्रिया सुळे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर सर्वच नेत्यांनी भाष्य करणे टाळले.
दादा नाराज नाहीत :
अजित पवार नाराज नाहीत, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. पार्थ प्रकरणावर चर्चा झालीच नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणालेे. दादा नाराज असण्याचे कारण नाही, मी सध्या कोरोनाप्रश्नी त्यांच्याशी व्हीसी करते आहे, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तर बैठक सामाजिक न्याय खात्याशी संबंधित होती, असे धनंजय मुंडे म्हणाले.

चलो काटेवाडी : अजित, सुनेत्रा व पार्थची आज काका श्रीनिवास यांच्याशी चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी ते पुण्याला गेले. शुक्रवारी त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. त्यापाठोपाठ पार्थही शुक्रवारी पुण्याला गेले. त्यांच्या आई सुनेत्रा यासुुद्धा पुण्यात आहेत. शनिवारी स्वातंत्र्यदिनी तिघे बारामतीला जाणार आहेत. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास यांच्या काटेवाडीतील घरी त्यांची बैठक होऊ शकते. तत्पूर्वी, गुरुवारी रात्री पार्थ पवार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. आत्या सुप्रिया यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. पण आजोबा शरद पवार यांच्याशी बोलणे झाले नसल्याचे समजते. या वेळी अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या तपासप्रकरणी शरद पवार यांनी गृहमंत्र्यांकडून या बैठकीत माहिती घेतली. दरम्यान, पार्थ पवार यास पक्षातील एखादी जबाबदारी देण्यावर चर्चा झाल्याचे समजते.

चर्चा बिहारची : केंद्राकडून देवेंद्रांची बिहारमध्ये नियुक्ती, की मुद्दाम पाठवणी ?

राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. फडणवीस यांच्याकडे असलेल्या उत्कृष्ट संघटनकौशल्यामुळे त्यांची विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे भाजपतील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी भाजपची रणनीती सुरू आहे. भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या. महाराष्ट्रात भाजपने सत्ता स्थापन केली नसली, तरी सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या होत्या. म्हणून फडणवीस यांना बिहारमध्ये नवी जबाबदारी दिली जाऊ शकते. बिहारचे प्रभारी म्हणून काम केल्यास फडणवीस यांच्यासाठी दिल्लीत जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...