आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:वर्षा बंगल्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट, पाच मुद्द्यांवर झाली चर्चा

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षण प्रश्नावरून निव्वळ लक्ष हटवण्यासाठी दोन दिवसांपासून हा भेटीगाठीचा सिलसिला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या गोपनीय भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असताना रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांत रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट झाली. उभयतांमध्ये तब्बल पाऊण तास खलबते सुरू होती. महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. शरद पवार हे आघाडी सरकारचे शिल्पकार आहेत. विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी ते मुख्यमंत्री ठाकरे यांची सातत्याने भेट घेत असतात. मात्र, पवारांची ही ‘वर्षा’भेट इतर भेटींपेक्षा लक्षवेधी ठरली. उभयतांच्या भेटीचा तपशील अधिकृतरीत्या उपलब्ध झालेला नाही. पवार यांच्या भेटी आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीनंतर थोरात म्हणाले की, संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात आम्ही तिन्ही पक्ष एक रणनीती बनवत आहाेत. पवार-ठाकरे भेटीबद्दल छेडले असता, सरकार चालवायचे तर अनेक प्रश्न असतात. शरद पवार यांचे आम्ही सातत्याने मार्गदर्शन घेत असतो. आजच्या भेटीत आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आघाडी सरकारला काही धोका नाही. तसेच राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीत काँग्रेसला काहीही वावगे वाटत नाही, असा खुलासा थोरात यांनी केला.

पवार-ठाकरे यांच्यात पाच मुद्द्यांवर झाली चर्चा

1. राज्यात जिल्ह्याजिल्ह्यांत विरोधी पक्ष मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन उभे करत आहे. त्याला तोंड देण्यासंदर्भात उपाययोजना करणे.

2. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात धसास लावणे.

3. संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकांस आघाडीने म्हणून सामूहिक विरोध करणे.

4. राज्यात वाढत चाललेला कोरोना संसर्ग 5. जीएसटीचा केंद्राकडून मिळवायचा परतावा.

लक्ष हटवणे उद्दिष्ट :

मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यात उठणारे संभाव्य वादळ लक्षात घेता त्यावरून निव्वळ लक्ष हटवण्यासाठी दोन दिवसांपासून हा भेटीगाठीचा सिलसिला सुरू झाला आहे. दोन दिवसातल्या भेटी सत्ताधारी आघाडी सरकारने घडवून आणलेल्या आहेत, असा सूर राष्ट्रवादी व शिवसेना या सत्ताधारी पक्षांत आहे.

बातम्या आणखी आहेत...