आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी. पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची काँग्रेसची तयारी असून संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद पवारांकडे देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा गुरुवारी राजकीय वर्तुळात होती. मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचा खुलासा सायंकाळी स्वत: शरद पवार यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारांच्या यूपीए नेतृत्वाच्या वृत्ताचे खंडन केले. साहेब दिल्लीत गेले की अशा चर्चा नेहमी होतात, असे ते म्हणाले. तर यूपीएचे अध्यक्षपद हा सध्या विषय नाही, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदाबाबत राज्यातील काँग्रेस नेते बोलण्यास तयार नाहीत. यूपीएमध्ये जो मोठा पक्ष आहे, त्याच्याकडे आपसूक अध्यक्षपद जाते. सध्या तरी यूपीएत काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाने पवारांना असा काही प्रस्ताव दिला असेल असे वाटत नाही, असे काँग्रेस नेते म्हणाले.
शेतकरी आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी बातम्या : शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याचा यूपीएमधील घटक पक्षांमध्ये असा कुठलाच प्रस्ताव नाही. तसेच अशी कुठली चर्चादेखील झालेली नाही. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात चालू असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी या निराधार बातम्या पेरल्या आहेत, असा खुलासा प्रदेश काँग्रेसने गुरुवारी सायंकाळी केला.
घटक पक्षांमध्ये चर्चा नाही
यूपीएमधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चादेखील झालेली नाही. जाणूनबुजून अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे असा प्रयत्न असल्याचा स्वतंत्र खुलासा सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केला.
पवारांच्या ‘ना’ मध्ये ‘हाँ ’
राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे, असे सातत्याने सांगणाऱ्या शरद पवार यांनी नंतर शिवसेना-काँग्रेससोबत आघाडी बनवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्याच धर्तीवर आता यूपीए अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाल्यावर पवारांनी नेतृत्वाचा प्रस्ताव नाही, असे सांगितले आहे. त्यामुळेच सोनिया गांधींच्या आजारपणामुळे अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून यूपीएमध्ये गंभीरपणे चर्चा सुरू झाली असावी याला पुष्टी मिळते.
काँग्रेसला सोनियाचे दिवस येणार नाहीत : मुनगंटीवार
यूपीएचे अध्यक्ष कोण व्हावे, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्यावर भाजपला भाष्य करण्याची गरज नाही. जे पक्ष एकजूट करत आहेत, ते जनतेच्या नजरेतून उतरले आहेत. काँग्रेसला पुन्हा ‘सोनिया’चे दिवस येणार नाहीत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
शेतकरी आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी बातम्या : काँग्रेसचा आरोप
अशी सुुरू झाली चर्चा : मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब व हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत. त्यासंदर्भात विरोधी पक्षातील पाच सदस्यांनी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक निवेदन दिले होते. त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पवार यांनी केले होते. सध्या यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आहे. पवार यांचे प्रादेशिक पक्षांशी सलोख्याचे संबध आहेत, त्यामुळे पवार यांच्याकडे यूपीएचे अध्यक्षपद द्यावे, असा एक प्रवाद आहे. तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसमधून आक्षेप घेतले जात आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.