आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘8 दशके कृतज्ञतेची’:फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर तरुणांनी मार्गक्रमण करावे : शरद पवार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ला हार्दिक शुभेच्छा : अजित पवार

गेली ५०-५५ वर्षे राज्यात काम करतोय. ही संधी जनतेनी मला दिलीय, साथ दिलीय म्हणून इथपर्यंत आलो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने ‘८ दशके कृतज्ञेची’ हा अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना पवार यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर मार्गक्रमण करण्याचा सल्ला तरुण पिढीला दिला.

ते म्हणाले, सार्वजनिक जीवनात काम करत असताना तळागाळातल्या माणसाच्या जपणुकीचं काम करता आलं पाहिजे. त्यातून आपण शिकत असतो. या वेळी ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारांपासून शिकलो त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे, असे सांगून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावांचा निव्वळ उल्लेख करून चालणार नाही तर त्यांच्या विचारांच्या दृष्टीने आपण गेलं पाहिजे, असे ते म्हणाले. जयंत पाटील यांचे कौतुक : कोरोनाकाळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे टाळत होतो. पण, सर्व राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणायची संकल्पना जयंतरावांनी मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही. आज सामूहिक कष्ट केले. त्या कष्टाचा सन्मान करण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्याबद्दल अंत:करणापासून पवार यांनी आभार मानले. देवेंद्र फडणवीसांना टोला : २०१९ ला झालेला चमत्कार आपण पाहिला. झालेले वार अडवण्याचे काम पवार यांनी केले. काही लोक म्हणाले की पवारांचा राजकीय कालखंड समाप्त झाला, परंतु बॉडीगार्ड आणि सरकारी लवाजमा सोडून ते महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

मराठवाड्याला पाणी देणार : मी जलसंपदा खात्याची जबाबदारी घेताच पवार साहेबांनी फोन करून नाशिक आणि मराठवाड्यात पाणी देण्याचे काम कसं होईल याची माहिती द्यावी, असा आदेश दिला. या कामाला आम्ही लागलोच आणि आता मी विश्वासाने सांगू शकतो की पुढील ३ वर्षांत पाणी समुद्रात वाया जाणारे हे पाणी मराठवाडा भागात फिरवण्याचे काम पूर्ण होईल. त्यासोबतच वैनगंगेच्या खोऱ्यातील पाणी नळगंगेला देण्याचे काम आम्ही हाती घेतल्याचे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राने खंबीरपणे पवारांच्या पाठीशी उभे राहावे : प्रफुल्ल पटेल
महाराष्ट्र खंबीरपणे पाठीशी उभा राहिल्यास पवार पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असे सूतोवाच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी जसे पश्चिम बंगालचे खासदार उभे राहू शकतात तसे पवार यांच्या पाठीशी महाराष्ट्राचे ४८ खासदार का उभे राहू शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करतानाच तसे पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास आपण स्वप्न पाहत आहोत, तो दिवस दूर नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. याप्रसंगी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर, त्यानंतर ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बीडहून सहभागी झाले होते.

हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ला हार्दिक शुभेच्छा : अजित पवार
हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ला हार्दिक शुभेच्छा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. राज्यावर संकट आल्यानंतर आपण धावून गेले पाहिजे. मागच्या ५० वर्षांपासून आपण शरद पवार यांना सामाजिक जीवनात काम करताना पाहतोय. ८० व्या वर्षीही ते त्याच ताकदीने काम करत आहेत. मला तर वाटतं, पवार साहेबांसारखा नेता या शतकात तरी होणार नाही. पवार साहेबांसारखे नेते आपल्याकडे आहेत, याचा मला अभिमान आहे, असे अजित पवार म्हणाले. तर आठ दशके म्हणजे ही शरद पवार यांची तपश्चर्या, साधना आहे. हीच तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला पुढे घेऊन जाणारी आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser