आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

80 वर्षांच्या तरुणाचा वाढदिवस:आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत, ते झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत, शिवसेनेकडून शरद पवारांवर स्तुती सुमने

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज

'आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत. पवार स्वतःच ‘सह्याद्री’ बनून देशाचे नेते झाले आहेत. ' असे म्हणत शिवसेनेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर स्तुती सुमने उधळली आहेत. आज शरद पवारा हे वयाची 80 वर्षे पूर्ण करत आहेत. या निमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'महाराष्ट्रातील काँगेस पक्षात खूप मोठे नेते मागच्या 70 वर्षांत निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता निर्माण झाला नाही. आजही लोक यशवंतरावांचेच स्मरण करतात. चव्हाणांनीच पवारांना घडवले. चव्हाणांनंतर त्यांच्याच तोलामोलाचा नेता म्हणून पवारांकडे पाहायला हवे. यशवंतरावांकडे ‘धाडस’ सोडले तर सर्व गुण होते. पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा अनेकदा जास्तच झालेली दिसते. यशवंतरावांप्रमाणेच माणसे जमवण्याचा व सांभाळण्याचा छंद पवारांना आहे. त्या छंदास कोणी बेरजेचे राजकारण म्हणत असतील तर पवार अनेक वर्षे ही बेरीज करीत आहेत. राज्यातील ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज आहे.' असे शिवसेनेचे मुखपत्र सामनमधून पवारांविषयी लिहिण्यात आले आहे.

'80 वर्षांचे होऊनही पवारांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. आज ‘कोणत्याही सत्तेच्या पदावर नसलेला लोकप्रिय नेता’ असे वर्णन मी पवारांचे करतो. खऱया अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!' अशा शब्दात शरद पवारांना सामनामधून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

'देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले पवार हे आज विरोधी पक्षातले एकमेव सर्वात शक्तिमान नेते आहेत. पवार 80 वर्षांचे होत आहेत त्याचवेळी मोदींचे प्रचंड बहुमत असूनही लोकांच्या मनात अशांतता आहे. शेतकरी, कष्टकरी दिल्लीस वेढा घालून पंधरा दिवसांपासून बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. लोकांना आकर्षित करील असे नेतृत्व आता उरलेले नाही. अशा वेळी महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला घोडा रोखून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची स्थापना करणारे, त्या सरकारचे नेतृत्व एका समझदारीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे शरद पवार देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करीत आहेत.' अशा शब्दात शरद पवारांचे वर्णन करण्यात आले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser