आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या वाहनांवर होणारे हल्ले 24 तासांत हल्ले थांबले नाहीत, तर बेळगावला जाऊ. बोम्मईंच्या वक्तव्याने देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होतोय. हे पाहता केंद्र सरकारला आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे खडेबोल गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक आणि केंद्रातल्या मोदी सरकारला सुनावले.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर आज पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तसेच इतके होऊनही महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका संयमाची राहिली. परंतु संयमालाही मर्यादा असतात, असा इशाराही त्यांनी दिला.
आता भूमिका घेण्याची वेळ
पवार म्हणाले, कर्नाटक - महाराष्ट्र सीमावादावार आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही अशी भाषा असो की, सीमावादावर भाष्य असो की, जतच्या ग्रामस्थांना केलेले आवाहन असो. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर केलेल्या भाषेवर आता भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
माझ्याकडे चिंताजनक माहिती
शरद पवार म्हणाले, माझ्याकडे जी माहिती आहे ती चिंताजनक आहे. आज मला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जे काॅल येत आहेत ते चिंता व्यक्त करणारे आहेत. एकीकरण समितीच्या कार्यालयासमोर पोलिस तैनात आहेत. समितीला निवेदन देण्यापासून मज्जाव केला जात आहे. मराठी लोकांवर बेळगावात दहशतीचे वातावरण आहे. कर्नाटकात 19 डिसेंबरला अधिवेशन असून त्यापूर्वी दहशत मराठी माणसांवर दडपशाही केली जात आहे.
तुम्ही धीर द्या
शरद पवार म्हणाले, तुम्ही कुणीतरी आम्हाला येऊन धीर द्यावा, असे पत्र एकीकरण समितीचे आहे. या भागातील लोकांची महाराष्ट्रात सामिल होण्याची तयारी आणि इच्छा आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांनी केलेला काॅल उपयोग झाला नाही.
संयमाला मर्यादा आहेत
शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर जे हल्ले झाले, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्र संयम बाळगत आहे. अजूनही बाळगेल. परंतु संयमालाही मर्यादा असतात. येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवरील हल्ले थांबले नाही, तर त्या संयमाला वेगळी किनार मिळेल व त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार त्यासाठी जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
देशाच्या ऐक्याला धोका
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अजूनही संयमाची आहे, पण कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याकडून चिथावणीखोर वक्तव्य येत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांकडून हल्ले होत असतील तर हे देशाच्या ऐक्याला फार मोठा धक्का आहे. हेच काम जर कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही.
तर कर्नाटक, केंद्र जबाबदार
शरद पवार म्हणाले, उद्यापासून संसदेत सेशन सुरू होत आहे. महाराष्ट्रातल्या खासदारांनी कर्नाटकाबाबत गृहमंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थिती सांगावी, असे मी सांगितले आहे. त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नसतील आणि जर कायदा हातात घेतला जात असेल तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारची असेल.
आम्ही संवेदनशील
शरद पवार म्हणाले, सीमावादावर आम्ही संवेदनशील आहोत. महाराष्ट्राची भूमिका एका पक्षाची नाही. यावर सर्व पक्ष एकत्र आले आहेत. तेव्हा बैठका घेत न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतला. आज ती लढाई न्यायालयात आहे. आपापली भूमिका मांडण्याची दोन्ही राज्यांना समान संधी आहे. परंतु, कर्नाटक सरकारकडून कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.