आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:आरक्षणप्रश्नी अन्याय नको, सहकारी बँका वाचवण्यासाठी टास्क फोर्स नेमा, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार सक्रिय

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 जून पक्षाचा वर्धापन दिन ऑनलाइन होणार

मराठा, ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणप्रश्नी कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्याबाबत पवार सीरम इन्स्टिट्यूटशी संपर्क साधणार आहेत. तसेच जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका कायदेबदल करून अडचणीत आणण्याचा केंद्राचा डाव असून तो हाणून पाडण्यासाठी टास्क फाेर्स स्थापन करा, अशा सूचना त्यांनी दिल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तथा प्रमुख नेत्यांची प्रदेश कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना मलिक म्हणाले, बँकिंग कायद्यात बदल करून रिझर्व्ह बँकेला जास्त अधिकार देऊन जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका अडचणीत आणून खासगी बँकांना फायदा करून देण्याचा केंद्राचा डाव आहे. याबाबत विस्तृत सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आले.

यासंदर्भात सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा यात समावेश करून केंद्र सरकारचा डाव हाणून पाडण्यात यावा असे ठरवण्यात आले. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांत राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या काळातच झाला होता. ओबीसींचे सर्व आरक्षण अबाधित राहावे अशीच पक्षाची भूमिका आहे. मराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण मिळावे अशीच पक्षाची भूमिका आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार योग्य ती भूमिका घेत आहे. पण याव्यतिरिक्त शिक्षण, कर्ज आदी मुद्द्यांवरदेखील सकारात्मक भूमिका पक्षाने घेतली असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

तसेच पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा पक्षाने गंभीरतेने घेतला असून आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी दिल्याचेे नवाब मलिक यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही.सरकार आपली पाच वर्षे पूर्ण करणार आहे. भाजपला आपल्याच पक्षातील नेत्यांच्या गळतीची चिंता लागली आहे. यामुळेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे वेगवेगळी विधाने करत असतात, असा दावा मलिक यांनी केला. शस्त्रक्रियेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले.

आॅपरेशन लाेटस कधीच यशस्वी हाेणार नाही
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष भक्कमपणे एकसाथ असून सरकारला कोणताही धोका नाही. ऑपरेशन लोटस कधीच यशस्वी होणार नसल्याचेही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जून रोजीचा वर्धापन दिन सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. सोशल मीडिया लाइव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी नेते संवाद साधतील. १ तारखेपासून कार्यकर्ता नोंदणीचा कार्यक्रम सुरू होणार असून १२ डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...