आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांचे पाणावले डोळे:शरद पवारांनी कुणालाच सांगितला नव्हता निर्णय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हुंदका, कार्यकर्त्यांचा आक्रोश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी 2 मे रोजी निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वात जबर आघात झाला तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर. कुणालाच याची कल्पना नव्हती, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

शरद पवारांनी ज्या कार्यक्रमात ही घोषणा केली, त्या कार्यक्रमातच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पवारांच्या निवृत्तीला जोरदार विरोध करू लागले. कार्यकर्त्यांनी पवारांना घातलेला घेराव आणि केलेला आग्रह पाहून राष्ट्रवादीचे इतर अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

जयंत पाटलांना तर अश्रूच आवरत नव्हते, खुद्द पवारांचेही डोळे पाणावले होते. आम्ही कुणाकडे पाहून लोकांसमोर जायचे, असा सवाल नेते-कार्यकर्ते विचारत होते. या प्रसंगी विविध नेत्यांनी आपापल्या परीने कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून केला. पवारांची देशाच्या, राज्याच्या राजकारणातील निकड प्रत्येकाने प्रकर्षाने सांगितली.

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रमुख नेत्यांच्या या काही प्रतिक्रिया पाहा....

जयंत पाटील-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावुक झाले. जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांकडे बघून आम्ही राजकारण केले. त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा केली. पवार साहेब मी तुम्हाला सगळा अधिकार देतो. तुम्ही आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या. पवार कोणा नवीन लोकांच्या ताब्यात द्यायचाय तो द्या. मात्र, तुम्ही पक्ष सोडून बाजूला जाणे कोणाच्याही हिताचे नाही. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुणीच काम करू शकणार नाही. वाचा सविस्तर

अजित पवार-

शरद पवार यांच्या निवृत्तीचा निर्णय समिती ठरवेल. समिती जो निर्णय घेईल तो पवारांना मान्य असेल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते. मात्र, कार्यकर्ते शरद पवारांनी लगेच राजीनामा मागे घ्यावा, या मागणीवर ठाम आहेत. वाचा सविस्तर

छगन भुजबळ-

ही कमिटी वगैरे आम्हाला मंजूर नाही. तुम्ही राजीनामा मागे घेतलाच पाहिजे.

प्रफुल्ल पटेल-

प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवारांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. याची आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. शरद पवार हा निर्णय मागे घेतील. त्यांनी तात्काळ काही ठोस आश्वासन आम्हाला द्यावे, अशी मागणी यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी केली.

अंकुश काकडे-

अंकुश काकडे म्हणाले, साहेब आपण जर हा निर्णय मागे घेतला नाही तर महाराष्ट्राच्या खेड्यात आत्महत्या होतील.

दिलीप वळसे पाटील-

दिलीप वळसे पाटील म्हणाले, हा निर्णय आम्हाला मान्य नाही. गोरगरिबांसाठी आपण आधार आहात. आता राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांना एकत्र करणे गरजेचे आहे. हे आपणच करु शकता. आता राष्ट्रवादी दिवसेंदिवस बळकट होत चालली आहे. आपण हा निर्णय मागे घ्यावा, ही नम्र विनंती.

नरहरी झिरवळ-

नरहरी झिरवळ म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रातील, सर्वसामान्य माणसाची तळमळ हीच आहे साहेब असा निर्णय घेऊ शकत नाहीत. लोक उद्यापासूनच आपल्याला विनंती करायला येऊ लागतील. यामुळे साहेब आपण निर्णय मागे घ्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. साहेब आपण निर्णय मागे घ्या. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचेही फोन येत आहेत.

फौजिया खान-

फौजिया खान म्हणाल्या, देशाला आपल्या नेतृत्वाची, अनुभवाची गरज आहे. साहेब आपल्याला विनंती आहे की, आपण निर्णय परत घ्यावा. देशातील गरीब, अल्पसंख्याकांचे आपण आधार आहात. ते सर्व अनाथ होऊन जातील.

विद्या चव्हाण-

विद्या चव्हाण म्हणाल्या, साहेब तुम्ही अजूनही धडधाकट आहात, तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यत आजही न थकता काम करत राहता. तरीही तुम्ही असा निर्णय घेत आहात, हे कुणालाही मान्य होत नाहीये. तुमच्याशिवाय दुसरे कुणी राष्ट्रीय अध्यक्ष असू शकत नाही. म्हणून तुम्ही हा निर्णय मागे घ्यावा.