आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिंचवड आणि कसबा या दोन्ही विधानसभा जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. त्याचा निर्णय मंगळवारी (२४ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाला. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने केला आहे, अशी माहिती पक्षाच्या नेते तथा विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी सांगितले.
मंगळवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले आहे. उद्धव ठाकरे यांनी कुणाला त्यांच्या कोट्यातून घ्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. शिवसेना-वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येत नाही, असा दावा पवार यांनी केला.
मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे हे निर्विवाद सत्य आहे. संघटना म्हणून मुंबईत शिवसेना मोठा पक्ष आहे. ‘आम्हाला बरोबर घ्या’ अशी सकारात्मक चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली होती, अशी माहितीही अजित पवार यांनी या वेळी दिली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधान परिषदेच्या निवडणुका, चिंचवड व कसबा पोटनिवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत रणनीतीबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. पुण्यातील पोटनिवडणुका अन् मुंबई महापालिका निवडणुकीतील आघाडी यासंदर्भात काँग्रेसची अद्याप भूमिका स्पष्ट नाही. राष्ट्रवादीने मात्र आपले घोडे पुढे दामटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीबाबत आज ठाकरे गटाची मातोश्रीवर होणार बैठक
१ पुण्यातील चिंचवड व कसबा या जागांवर दावा करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला. २०१९ मध्ये कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसचे अरविंद शिंदे निवडणूक लढले होते. तर चिंचवड मतदारसंघात शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मदतीने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी राहुल कलाटे यांनी १ लाख १२ हजार मते मिळवली होती.
२ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार हे मंगळवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. यात पुण्यातील पोटनिवडणुकीसह शिवसेना आणि वंचितच्या युतीबाबतही चर्चा होणार आहे.
३ कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका ठरवण्याबाबत ठाकरे गटाने बुधवारी (२४ जानेवारी) आपल्या नेत्यांची बोलावली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह, खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.