आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवारांच्या राजीनामा माघारीवेळी अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे पुन्हा एकदा नाना चर्चा सुरू झाल्या. पत्रकारांनी याबद्दल प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मात्र, शरद पवारांनी अगदी चाणाक्षपणे हे प्रश्न तर टोलावून लावलेच, शिवाय काही प्रश्नांना मार्मिक उत्तरे दिली. त्यामुळे सारेच बुचकळ्यात पडले.
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात फक्त पवार नावाची चर्चा सुरू होती. कार्यकर्त्यांनी मुंबई दणाणून सोडली होती. अखेर या साऱ्यावर पवारांच्या राजीनामा माघारीने पडदा पडला.
राजीनामास्त्र मॅन
ऐन दोन मे रोजी, लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळीच यशवंतराव चव्हाण केंद्रात ठिय्या मारून आंदोलन सुरू केले. गेल्या तीन दिवसांपासून ठिकाठिकाणी आंदोलने झाली. हा असंतोष वाढत असतानाच निवड समितीच्या निर्णयानंतर अखेर आज शरद पवारांनी आपले राजीनामास्त्र मॅन केले.
दुसरी चर्चा सुरू
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रातच शरद पवारांनी या साऱ्या प्रकरणावर पडदा टाकला. कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आपण भारावून गेलो आहोत. या आग्रहास्तव आपण राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी केली. शिवाय पक्षात नव्या नेतृत्वासाठी काही संघटनात्मक बदल घडवण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र, या पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाली.
हे साफ खोटे
पत्रकारांनी अजित पवारांच्या गैरहजेरीबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा कुणाच्या अनुपस्थितीचा वेगळा अर्थ काढू नका, असे म्हणत शरद पवारांनी हा प्रश्न टोलावून लावला. शिवाय अजित पवार दिल्लीला गेले, ही माहिती चूक आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जाऊ इच्छितात हे खोटे असल्याचे म्हणत त्यांची पाठराखण केली.
दादांना कल्पना होती
शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयाची अजितदादांना कल्पना होती, हे सुद्धा सांगितले. शिवाय, अजित पवार यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. मात्र, यावेळी त्यांनी पक्षात उत्तराधिकारी असण्याची गरजही व्यक्त केली. मात्र, सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार यात तथ्य नसल्याचे सांगितले.
थांबवू शकत नाही
एका प्रश्नाच्या उत्तरात कुणाला जायचे असल्यास थांबवू शकत नाही म्हणत भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेवर उत्तर दिले. आजच्या या पत्रकार परिषदेतही पवारांनी कधी अजित पवारांची पाठराखण केली. तर कधी टोले मारल्याचे दिसून आले. गैरहजेरीचा अर्थ वेगळा काढू नका, असा उल्लेख शरद पवारांनी केला खरा. मात्र, पवारांची प्रत्येक कृती आणि शब्दांचा राजकारणात वेगळा अर्थ निघतो. याची प्रचिती या पत्रकार परिषदेत आली.
संबंधित वृत्तः
शरद पवारांकडून राजीनामा मागे, अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली; पत्रकार परिषदेत घोषणा
शरद पवारांच्या राजीनाम्याने अजितदादा चेकमेट; विरोधकांना कात्रजचा घाट, जाणून घ्या 8 कलमी पावर गेम!
राजीनामा फेटाळल्याचे कळवले, पण शरद पवारांनी वेळ मागितला; प्रफुल्ल पटेलांची माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.