आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी घोटाळ्यावर भूमिका:हिंडेनबर्ग कोण माहिती नाही? जेपीसीत भाजपचेच बहुमत असेल तर ती उपयुक्त नाही- शरद पवार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. त्यामुळे अदानी घोटाळ्यावरुन विरोधकांच्या एकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जेपीसीत भाजप सदस्यांचीच संख्या अधिक राहील

शरद पवार म्हणाले, जेपीसीमध्ये लोकसभा व राज्यसभेत जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्याच खासदारांची संख्या अधिक असते. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता जेपीसी बनवलीच तर त्यात भाजपचे 15 खासदार असतील. उर्वरित 6 ते 7 खासदार विरोधी पक्षातील असतील. ज्या जेपीसीत विरोधकांची संख्या एवढी कमी आणि सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असेल, अशा समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित करायला वाव आहे.

सुप्रीम कोर्टाची समिती अधिक उपयुक्त

शरद पवार म्हणाले, जेपीसीत भाजपचेच बहुमत असेल तर ती उपयुक्त ठरणार नाही, याची मला खात्री आहे. मी स्वत: एका जेपीसीचा अध्यक्ष राहिलेलो आहे. त्याऐवजी सुप्रीम कोर्टानेच या घोटाळ्याची चौकशी करणे उपयुक्त राहील. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून व त्यांच्यासोबत सत्ताधारी व विरोधकांचे काही सदस्य घ्यावेत. अशी कमिटी अधिक उपयुक्त ठरेल. बहुमताच्या आधारे घोटाळ्याबाबत निर्णय होणार असेल तर ते निरुपयोगी ठरेल.

हिंडेनबर्ग कोण आहे?

शरद पवार म्हणाले, हिंडेनबर्ग कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय?, हे मला माहितीही नाही. एक परदेशातील कंपनी काही तरी अहवाल बनवते व त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो, हे योग्य नाही. अशा अहवालाकडे किती लक्ष द्यायचे, याचाही विचार केला पाहीजे. एखाद्या संस्थेने आपल्या देशातील उद्योगाबद्दल सांगण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने त्याविषयी सांगणे अधिक योग्य व विश्वासार्ह आहे.

19 विरोधी पक्षांना जेपीसीत संधी नाही

काँग्रेसह 19 विरोधी पक्षांनी जेपीसीची मागणी केली असताना शरद पवारांनी मांडलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे विरोधकांत अदानींच्या मुद्यावरुन फूट पडलीये का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शरद पवार म्हणाले, सर्वच्या सर्व 19 विरोधी पक्षांना तर जेपीसीमध्ये स्थानही मिळणार नाही. फार फार एक-दोन पक्षांना स्थान मिळेल. ठराविक पक्षांनाच जेपीसीमध्ये संधी दिली जाईल.

महागाई, बेरोजगारी, शेती हेच प्रमुख मुद्दे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानींच्या कंपनीत एलआयसीचे पैसे बुडाल्याचा आरोप केला आहे. तसेच, अदानींच्या कंपनीत गुंतवणूक झालेले 20 हजार कोटी रुपये कोणाचे?, असा सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे. यावर शरद पवार म्हणाले, एलआयसी व 20 हजार कोटींबाबतची माहिती माझ्याकडे नाही. त्याची आकडेवारी घेऊनच मला त्यावर भाष्य करता येईल. तसेच, केवळ अदानीवर चर्चा करण्याऐवढा हा मोठा विषय आहे का?, याचाही विचार केला पाहीजे. देशात सध्या बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांच्या समस्या या तीन प्रमुख समस्या आहेत. यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

अदानींचे योगदान मान्य करावे लागेल

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राला सर्वाधिक वीज अदानींकडूनच मिळते. मी अदानींचे कौतुक करत नाही. मात्र, अदानींचे योगदान मान्य करावे लागेल. पूर्वी टाटा-अंबानींचे नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली जायची. मात्र, नंतर टाटांचे देशासाठी मोठे योगदान आहे, याची जाणीव झाल्यानंतर तशी टीका करणे बंद झाले. आता अदानींचे नाव घेऊन त्याप्रमाणेच टीका केली जात आहे. मात्र, अदानींचेही काही तरी योगदान आहे, हे मान्य करावे लागेल.

संबंधित वृत्त

राजकारण:शरद पवारांच्या भूमिकेमुळे 'मविआ'त फूट पडणार नाही, विरोधी पक्ष जेपीसीच्या मागणीवर ठाम; संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

शरद पवारांनी अदानींबाबत वेगळी भूमिका घेतली असली, तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात शरद पवारांनी जेपीसीऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती जास्त परिणामकारक ठरेल, अशी भूमिका मांडल्यानंतर राऊत यांनी जेपीसीबाबत विरोधी पक्षाची मागणी ठाम असल्याचे स्पष्ट केले. वाचा सविस्तर