आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर टीकास्त्र:लोकांना खोके, फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकचा निकाल- शरद पवार

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये भाजपने फोडाफोडी करून काँग्रेसकडून सत्ता बळकावली होती. मात्र, लोकांना फोडाफोडीचे, खोक्याचे राजकारण आवडत नाही, हे कर्नाटक विधानसभा निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपने काँग्रेसचे सरकार पाडले

शरद पवार म्हणाले, सत्ता, केंद्रीय तपास यंत्रणा, पैशांचा गैरवापर करून भाजपने अनेक राज्यात विरोधी पक्षांची सरकारे पाडली. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी जे केले, त्याचप्रमाणे गोवा, कर्नाटकातही भाजपने साधनांचा गैरवापर करून तेथे काँग्रेसचे सरकार पाडले होते. मात्र, आता काँग्रेस दुपटीहून अधिक जागांनी सत्तेवर आली आहे. तर, भाजपच्या जवळपास 50 जागा कमी झाल्या आहेत. म्हणजेच लोकांना खोक्याचे, फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटक विधानसभेचा निकाल.

यापुढेही असेच चित्र दिसेल

शरद पवार म्हणाले, कर्नाटकचा आजचा निकाल हा आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट करणारा निकाल आहे. देशात भाजपची हवा आहे, असे जे चित्र रंगवले जाते, ते चुकीचे आहे. देशभरातील अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या हातून सत्ता गेली आहे. केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, झारखंड, पंजाब अशा बहुतांश राज्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. देशात यापुढील निवडणुकांमध्येही हेच चित्र दिसेल, असा विश्वास आहे.

मोदींना हे शोभत नाही

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बलीचा नारा दिला होता. त्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, राजकारणासाठी धर्म, जात यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर तो लोकांना आवडत नाही, हे कर्नाटकच्या विधानसभेच्या निकालाने दाखवून दिले आहे. मुळात कर्नाटकच्या निवडणुकीत धार्मिक घोषणा देण्याची काहीही गरज नव्हती. पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा धार्मिक घोषणा देणे शोभत नाही. या पदावर बसतानाच त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतलेली असते. राजकारणासाठी धर्माचा वापर करणे लोकांना आवडत नाही. त्याचा वापर पंतप्रधानांनी केला व त्याची तीव्र प्रतिक्रिया लोकांनी दिली. धर्मातीत राजकारण करणे हाच आमचा आदर्श आहे.

भाजपबद्दल रोष

शरद पवार म्हणाले, कर्नाटकवासीयांमध्ये भाजपबद्दल रोष होता. निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसेल, याची खात्री आम्हाला होती. भाजप सध्या देशभरात सत्ता मिळवण्यासाठी खोके, फोडाफोडीचे सूत्र वापरत आहे. ही चिंताजनक बाब होती. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्याचे काम कर्नाटकच्या जनतेने केले. याबद्दल कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन. कर्नाटकच्या निकालावरून देशाच्या पुढील निवडणुकांत काय होईल, याचा अंदाज नक्कीच लावता येईल.

संबंधित वृत्त

कर्नाटक विधानसभेचा निकाल:आयोगाच्या कलांमध्ये काँग्रेस 114 जागांवर पुढे, पक्षाने सर्व आमदारांना बंगळुरूत बोलावले

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस 114 जागांवर, भाजप 73 जागांवर, जेडीएस 30 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला 43.2 टक्के, भाजपला 36 टक्के आणि जेडीएसला 13 टक्के मते मिळत आहेत. वृत्तवाहिन्यांच्या कलानुसार काँग्रेस 115, भाजप 73, जेडीएस 30 आणि इतरांना 6 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. वाचा सविस्तर