आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार जाऊन आता 9-10 महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांशी चर्चा केली नाही, अशी नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
तसेच, चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्पपरिणाम होतात, असे खडेबोलही शरद पवार यांनी सुनावले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणावर अनेक महत्त्वाचे वक्तव्य करत विरोधकांसह ठाकरेंचेही कान टोचल्याचे दिसत आहे.
ठाकरेंनी विचारात घ्यायला हवे होते
राज्यात 9-10 महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवे होते. आम्ही तीन पक्षांनी मिळून सरकार बनवले होते. अर्थात राजीनामा देण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार आहे. मात्र, राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांशी चर्चा केली नाही. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत कोणतीही चर्चा केली नाही, हे वास्तव आहे. ते नाकारण्यात काही अर्थ नाही.
सहकारी पक्षांसोबत चर्चा करायला हवी होती
शरद पवार म्हणाले की, सत्तासंघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांसोबत चर्चा करण्याची आवश्यकता होती. तिन्ही पक्षांनी मिळून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता. यात तिन्ही पक्षाचा सहभाग होता. आता या व्यक्तिरिक्त दुसरा विचार कुणी करत असेल तर तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण, सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती.
लोकांसाठी आक्रमक व्हा, वैयक्तिक हल्ला नको
काही दिवसांपूर्वीच फडतूस गृहमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेत्यांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. यावरून राजकारणातील घसरत चालेल्या टीकेच्या पातळीवरूनही शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले. वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे खडेबोल शरद पवार यांनी सुनावले. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. जनतेला अशी वैयक्तिक टीका-टिप्पणी आवडत नाही. त्यामुळे नेत्यांनी शक्यतो अशा गोष्टी टाळायला हव्यात. त्याऐवजी नेत्यांनी लोकांच्या समस्यांवरून आक्रमक व्हावे. त्यावर राजकारण करावे. वैयक्तिक चिखलफेक काही कामाचा नाही. त्यामुळे ते टाळण्याचे काम जाणीवपूर्व केले पाहीजे.
...तर जेपीसी चौकशीला विरोध नाही
अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे अदानी घोटाळ्यावरुन विरोधकांच्या एकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विरोधकही जेपीसी चौकशीवरच ठाम असल्याने आता शरद पवारांनीही यावर मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. शरद पवार म्हणाले, सहकारी मित्रपक्षांचे मत माझ्या मतापेक्षा वेगळे आहे. आम्हाला विरोधकांमध्ये एकी ठेवायची आहे. त्यामुळे त्यांना जेपीसी चौकशी योग्य वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. विरोधकांच्या एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही.
कोण कोणासोबत जाईल सांगता येणार नाही
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेमुळे राज्यात भूकंप आला होता. राज्याच्या राजकारणात आजही पहाटेच्या शपथविधीची चर्चा होते. यावर शरद पवार म्हणाले की, कोण कशी भूमिका घेईल, हे आज सांगता येणार नाहीत. पण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्रित काम करण्याची मानसिकता आहे. मला आता तरी काळजी करण्याची गरज नाही. मात्र, उद्या कोणी वेगळे जाण्याचा निर्णय घेतला तर तो त्याचा निर्णय असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.