आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असून तेच अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत, अशी घोषणाच त्यांनी आज (ता. 5) पत्रकार परिषदेत केली. जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर पक्षाचे अध्यक्षपदी कायम राहून कार्य करत राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती समिती केली. यावर आता शरद पवार आपली ठोस भुमिका आज पत्रकार परिषदेत मांडली.
जबाबदारीतून मुक्त होण्याची ईच्छा होती
शरद पवार म्हणाले, मी सर्व जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी इच्छा होती. मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांत तीव्र भावना निर्माण झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते माझे सहकारी अस्वस्थ झाले होते. मी या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी एकमुखाने मागणी केली होती.
..हेच समाधानी जीवनाचे गमक
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील निरनिराळे कार्यकर्ते यांनी अध्यक्ष राहावे अशी त्यांनी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. मी या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने तसेच देशातून विविध पक्षांच्या नेत्यांकडून आलेली आवाहने या सर्वांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.
जनतेचे प्रेम बघून भारावलो
शरद पवार म्हणाले, मी कार्यकर्ते आणि जनतेचे प्रेम बघून भारावून गेलो. पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणांसह काम करेल. उत्तराधिकारी असावा हे माझे स्पष्ट मत आहे. मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतो हा निर्णय मी पुनश्च जाहीर करतो.
..ती माझी नैतिक जबाबदारी होती
शरद पवार म्हणाले, माझी नैतिक जबाबदारी होती की, वरिष्ठांना विश्वासात घेणे, पण मी त्यांना विश्वासात घेतले असते तर त्यांनी मला राजीनामा देण्यास विरोध केला असता. त्यावेळीचा माझा निर्णय योग्य नव्हता या निष्कर्षापर्यंत मी आलो असे मला वाटते.
भाकरी फिरवणार होतो पण ती थांबली
शरद पवार म्हणाले की, भाकरी फिरवणार होतो पण आता भाकरीच थांबली. मविआला काहीही फरक पडणार नाही. आम्ही एकत्र काम करू. अजित पवार या पत्रकार परिषदेला गैरहजर होते त्यावर शरद पवार यांनी स्पष्ट केले की, ''इथे कोण आहे कोण नाही याचा वेगळा अर्थ काढू नका. मी फेरविचार करावा हेच सर्वांचे मत होते.'' कुणाला जायचे असेल तर मी थांबवू शकत नाही. मात्र अशा परिस्थितीत नेतृत्वाला आघाडीवर राहून काम करावे लागते.
देवेंद्र फडणवीसांवर वक्तव्य
शरद पवार म्हणाले, काम करण्याची संधी द्या ही अनेकांची सूचना आहे. याबाबत आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा लागेल. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात याच्याशी मला काही घेणे देणे नाही. राहुल गांधी स्वतः बोलले. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंतर्फे संजय राऊत आणि बाकीचे सहकारी राजीनामा मागे घेण्याबाबत बोलले.
राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाणार हे खोटे
शरद पवार म्हणाले, मी माफी मागतो कारण मी कुणाला राजीनाम्याची कल्पना दिली नव्हती. फक्त अजित पवारांनाच याची कल्पना दिली होती. सुप्रिया सुळे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार यात तथ्य नाही. राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाणार हे खोटे आहे.
शरद पवारांचे भाषण जसेच्या तसे
दिनांक २ मे २०२३ रोजी 'लोक माझे सांगाती' ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती...
परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती' असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.
'लोक माझे सांगाती' हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने 'मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे' या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.
मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.
आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद !
(शरद पवार)
5 मे, 2023
अपडेट्स
- राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक झाली. सर्वांशी चर्चा करून समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला. दरम्यान, पवारांना समितीचा निर्णय कळवण्यात आला आहे. या ठरावावर विचार करण्यास आणखी वेळ हवा असल्याचे सांगितले असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना सांगितले.
- आम्हाला दिलेले काम आम्ही केले आहे, शरद पवारांनी आम्ही विनंती केली असून आता ते काय निर्णय घेता यासाठी आपण त्यांना थोडा वेळ देणे गरजेचे आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
-जयंत पाटील म्हणाले की, समितीच्या निर्णयासह कार्यकर्त्याच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या आहेत. देशभरातील नेतेे यांचे मतही आम्ही पवारांच्या कानावर टाकली असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्याह इतर नेते सिल्व्हर ओकवर पोहचले आहेत. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना राजीनामा नामंजूर केल्याची माहिती देणार. कार्यकर्त्यांचा भावना कळवणार.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.