आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपला अनुकूल वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्रीच ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांमध्ये सुमारे सव्वातास खलबते झाली. आता या विशेष भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला असला तरी चर्चेचा अजेंडा वादग्रस्त मुद्द्यांबाबतचाच असल्याची माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलेले असताना संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, आपापल्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्यातील सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावे या मताशी आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आमचे ठरले असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
मविआत सगळे आलबेल-राऊत
संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ अशी बैठक झाली. बैठकीत राजकीय घडामोडींवर, भविष्याची दिशा ठरवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मकचर्चा झाली. मविआचे ऐक्य अबाधित ठेवणे हा चर्चेचा अंजेडा होता. महाविकास आघाडीबाबत जाणुनबुजून गैरसमज पसरवले जात आहेत. महाविकास आघाडी घट्ट आहे. काँग्रेसशीही आमचा संवाद सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये चांगला संवाद आहे. तसेच, काँग्रसचे महासचिवही येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
नात्यातला ओलावा महत्त्वाचा
सुप्रिया सुळे ठाकरे-पवार भेटीवर म्हणाल्या, मी या बैठकीत उशीरा सहभागी झाले. माझी मुलगी इंग्लंडवरुन आलेली आहे. ती पुढे काय करणार, तिचे करियर आमच्या मुलांच्या भविष्याबाबत चर्चा झाली. कौटुंबिक विषयांवर यावेळी बोलणे झाले. मी पूर्णवेळ त्यांच्या चर्चेत नव्हते. माझी आणि उद्धवजींची ताडोबावर चर्चा झाली. मला नात्यातला ओलावा मला महत्त्वाचा वाटतो.
संबंधित वृत्त
शरद पवारांचा B प्लॅन
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना मात्र त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.