आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार निवृत्तीवर ठाम:5 मे रोजी ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष; निवड समितीची पहिली पसंती सुप्रिया सुळे यांना

प्रतिनिधी | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. केवळ दोन दिवसांची मुदत मागून त्यांनी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आता समितीची ५ मे रोजी बैठक होईल. तीत नव्या पक्षाध्यक्षांचा निर्णय होऊ शकतो. निवड समितीतील अनेक नेत्यांची सुप्रिया सुळे यांच्या नावास पसंती आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी पक्षातील नाराजीनाट्यही समोर आले. मुंबईत बैठकांचे सत्र सुरू असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुण्यात होते. पत्रकारांनी विचारले असता “मला बैठकीचे काहीच माहिती नाही. कदाचित मला बोलावण्याची गरज वाटली नसेल,’ अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. ही बातमी पसरल्यावर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी सारवासारव केली. बैठका नियोजित नव्हत्या, मन वळवण्यासाठी पवारांशी फक्त चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

या नेत्यांनी दिले संकेत

भुजबळांनी मांडली पवारांच्या ‘मन की बात’... सुप्रियांना द्या राष्ट्रीय जबाबदारी

छगन भुजबळ : सुप्रिया सुळेंना केंद्रात व अजितदादांना राज्यात जबाबदारी द्यावी, असे माझे वैयक्तिक मत आहे.

प्रफुल्ल पटेल : अध्यक्षपदाच्या स्पर्धेत यांचेही नाव आहे. पण पत्रकार परिषदेत त्यांनी या शक्यतेचा स्पष्ट इन्कार केला.

अजित पवार : राष्ट्रीय राजकारणात रस नाही. पवारांच्या निवृत्तीचे समर्थन करताना आपण नव्या नेत्याला जबाबदारी देऊ पाहतोय, असे सांगत होते. याचा अर्थ ते इतर कुणाबद्दल तरी बोलत होते.

सुप्रिया सुळे : दोन दिवस खूपच शांत. नेतृत्वाबाबत बोलणे टाळले. वेळोवेळी कार्यकर्त्यांची चौकशी करताना दिसल्या.

‘वातावरण बदलल्याने’ महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना ब्रेक!
महाविकास आघाडीचे आधारस्तंभ शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करताच आघाडीत बिघाडीचे वारे वाहू लागले आहे. भाजपविरोधात आघाडीने आतापर्यंत नागपूर, छत्रपती संभाजीनगर व मुंबईत भव्य वज्रमूठ सभा घेतल्या. मात्र आता पवारांच्या निर्णयामुळे पुणे, कोल्हापूर, नाशिक, अमरावती येथील सभांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पुण्यात होणारी सभा वाढत्या उन्हामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मात्र त्यामागचे खरे कारण या सभेची जबाबदारी राष्ट्रवादीवर होती, त्यांनीच अंग काढून घेतलेय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अवकाळी पावसाचे कारण देत पुढच्या सभा होतील की नाही याबाबत साशंकता असल्याचे मान्य केले.

  • ‘साहेब, निर्णय मागे घ्या..’ दुसऱ्या दिवशीही घोषणाबाजी
  • वाय.बी. सेंटरमधून बाहेर पडताना कार्यकर्त्यांनी पवारांना घेराव घातला होता.
  • पवारांना चूक मान्य, पण समितीचा आग्रह कायम.

काय म्हणाले शरद पवार...

  • वरिष्ठ नेते, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवृत्तीचा निर्णय घेणे ही माझी चूक होती, हे शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांकडे मान्य केले. पण जर तुम्हाला विचारले असते तर साहजिकच मोठा विरोध झाला असता. त्यामुळे थेट घोषणा करावी लागली, असे समर्थनही त्यांनी केले. आता ५ व ६ मे रोजी निवड समितीची बैठक बोलवा. तीत नेतृत्वाचा निर्णय घ्या. समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.