आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीसाठी आपण इच्छुक नाही. त्यामुळे मी राष्ट्रपतीपदाचा विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या बाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संयुक्त उमेदवार उभे करण्याची चर्चा सुरूय. त्यावरच मुंबईत सोमवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी ही भूमिका स्पष्ट केल्याचे समजते.
काँग्रेसने दिलाय पाठिंबा
राष्ट्रपती निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसने कालच शरद पवारांना पाठिंबा दिला होता. पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले, तर काँग्रेस पाठिंबा देईल, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल, तर याचा मला आनंदच होईल, असे पटोले म्हणाले होते. तसेच, आम आदमी पक्षही राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांना पाठिंबा देणार असल्याची चर्चाय. आप नेते संजय सिंह यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती.
विरोधकांची उद्या बैठक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता. 15) विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांसह बैठक आयोजित केली आहे. बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची मोट बांधण्याची तयारी तृणमृल काँग्रेसकडून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत राष्ट्रपती पदासाठी कोणत्या नावाची चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची मागणी
राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच केवळ राष्ट्रपती पद कशाला, शरद पवारांकडे आता संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व द्यावे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे. देशात प्रचंड जनसंपर्क असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश होतो. त्यामुळे शरद पवारांसारखे व्यक्तिमत्व राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात स्वत:ला कोंडून घेणार नाही, असे आव्हाड म्हणाले. तसेच, राष्ट्रपती पदासाठी संख्याबळ पाहून निर्णय घ्यायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.