आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणेही योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीत मांडली आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.
बैठकीत सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असे आवाहनही शरद पवारांनी केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा मी आदर करतो, असे म्हटले आहे. त्यामुळे यापुढे राहुल गांधी आणि काँग्रेस सावरकरांचा मुद्दा टाळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसतर्फे आयोजित डिनरवर उद्धव सेनेचा बहिष्कार
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांचा अवमान केल्याचा आरोप भाजप-शिवसेना करत आहे. महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव सेनेलाही याच मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेने घेरले आहे. त्यामुळे ‘हिंदुत्ववादी’ प्रतिमेला तडा गेलेल्या उद्धव ठाकरेंनी रविवारी ‘सावरकरांचा अवमान सहन करणार नाही’ असा इशारा मालेगावच्या सभेतून राहुल यांना दिला. इतकेच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंतर्फे आयोजित डिनरवर उद्धव सेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली.
18 विरोधी पक्षांचा बहिष्कार, उद्धव सेनेचा बहिष्कार
काँग्रेसने सोमवारी सायंकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी डिनर आयोजित केले होते. तत्पूर्वी झालेल्या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. त्यात अदानी घोटाळ्यावरुन जेपीसीचा मुद्दा लावून धरण्याचे ठरले. राहुल गांधी पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले. डिनरमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट), तृणमूल काँग्रेसचे नेते नव्हते. बैठकीला 18 पक्षांची उपस्थिती होती. यात राष्ट्रवादी, आप, जेएमएम, डीएमके, जेडीयू, बीआरएस, आरजेडी, सीपीआई, सीपीएम, आरएसपी, नेशनल कॉन्फ्रेंस, आईयूएमएल, एमडीएमके इत्यादीचे नेते सहभागी झाले होते. उद्धवसेना सावरकर मुद्यावरून नाराज असल्याने या बैठकीत त्यांचे खासदार सहभागी झाले नाही.
शरद पवारांची मध्यस्थी
उद्धव सेनेच्या याच नाराजीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत मांडला. आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर आपण चर्चा करायला हवी. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही शरद पवारांच्या मताचा आपण आदर करत असल्याचे सांगितले. तसेच, राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा आदर करतो, असे म्हटल्याची माहिती आहे. त्यामुळे यापुढे राहुल गांधी सावरकारांविषयी बोलणे टाळणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मालेगावच्या सभेत काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. आपण एकत्र आलो आहोत, त्याला फाटे फुटू देऊ नका. आता वेळ चुकली तर देश हुकूमशाहीकडे जाईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना दिला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर शनिवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाच्या मुद्द्यावर माफी मागणार नाही हे सांगताना ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाही,’ असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता.
फडणवीस, शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत उद्धव यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. इतकेच नव्हे तर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची घोषणाही केली. 2004 मध्ये सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारो आंदोलन केले होते, त्याचा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत दाखवला. उद्धव ठाकरेही याप्रमाणे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणार का?, असे आव्हान एकनाथ शिंदेंनी दिले होते.
संबंधित वृत्त
सावरकरांच्या मुद्द्यावरून तापले राजकारण, भाजप-सेना काढणार गौरव यात्रा; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसशी दुरावा
सत्तेला लाथ मारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यांच्या फक्त भाषणात सावरकर जिवंत राहतील. कृतीमध्ये मात्र ते दिसणार नाहीत. आम्ही मात्र प्रत्येक जिल्हा, तालुका, विधानसभा मतदारसंघ आणि गावागावातून गौरव यात्रेच्या माध्यमातून सावरकरांनी केलेले कार्य पुन्हा समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणार आहोत. स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेधही करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.