आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रायसेस मॅन:मेट्रो कारशेडचे रुतलेले गाडे शरद पवार आणणार रुळावर, तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशीही केली चर्चा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांदिवली चारकोप येथे रविवारी मेट्रो ट्रायल रनच्या तयारीची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. - Divya Marathi
कांदिवली चारकोप येथे रविवारी मेट्रो ट्रायल रनच्या तयारीची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
  • दोन दिवसांत पंतप्रधान मोदींना भेटणार, शिवसेना-भाजप वादावर राष्ट्रवादीची फुंकर

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडप्रकरणी विरोधक आणि महाविकास आघाडीचे राज्य सरकार यांच्यातला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व आघाडी सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार यामध्ये मध्यस्थी करणार आहेत, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी रविवारी प्रसिद्धी माध्यमांना दिली. कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार निश्चित प्रयत्न करतील. गरज पडली तर दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतीलसुद्धा. या मुद्द्यावर पवार हे मोदींशी चर्चा करणार आहेत,असे ते म्हणाले.

कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवून जैसे थेचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर भाजप नेते आणि शिवसेना यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. कारशेडबाबत कुठेतरी एकोपा निर्माण करायला पाहिजे, असे पवार यांचे म्हणणे आहे, तर यामध्ये कुठलाही मार्ग निघाला तर हरकत नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्याची माहिती मलिक यांनी विक्रोळी पार्कसाइट येथे कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांना दिली.

हाेय, मी मुंबई-महाराष्ट्राच्या विकासासाठी अहंकारी आहे : उद्धव ठाकरे
मी अहंकारी असल्याचे काही लोक म्हणत आहेत. होय, मी अहंकारी आहे. पण माझ्या मुंबईसाठी मी अहंकारी आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी अहंकारी आहे, असे सांगत मेट्रो कारशेड वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्य सरकारने बुलेट ट्रेनसाठी बीकेसीत जागा दिली. आता केंद्र सरकारने कद्रूपणा सोडून कांजूरमार्गची जागा द्यावी. हवे तर कांजूरमार्ग कारशेडचे श्रेय तुम्हाला देतो, पण जागेचा वाद सोडवण्यासाठी विरोधकांनीही पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी या वेळी कोरोनाच्या संकटावरून जनतेला सावध केले तसेच भाजपला चिमटेसुद्धा काढले. या वेळी उद्धव यांनी विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणतीही खळखळ न करता बीकेसीत बुलेट ट्रेनला जागा दिली, पण आम्हाला जागा देताना मात्र खळखळ केली जाते. केंद्राने कांजूरची जागा त्यांची असल्याचा दावा केला. खरे तर केंद्र आणि राज्याने हा प्रश्न एकत्र बसून सोडवला पाहिजे, असे सांगून कद्रूपणा सोडा. आपण एकत्र बसून हा प्रश्न सोडवू, असे आवाहन त्यांनी भाजपला केले.

श्रेय तुम्हाला देतो, पण कांजूरला जागा देताना कद्रूपणा करू नका : मुख्यमंत्री
हवे तर कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेच पलटवार केला. हा श्रेयाचा प्रश्नच नाही. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे. त्यांना आणखी त्रास देऊ नका. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशी विनंती फडणवीस यांनी केली. मेट्रो कारशेडचा प्रश्न श्रेयाचा नाहीच, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधांचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही. त्यामुळे हा प्रश्न अपश्रेयाचा करू नये आणि हे अपश्रेय तुमच्या वाट्याला येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आरेतील कारशेडसाठी भविष्यात अतिरिक्त जागा लागणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव यांचा मुद्दा फडणवीस यांनी खोडून काढला. आरेत कारशेड झाले असते तर भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नव्हती. मग ही दिशाभूल कशासाठी होत आहे, असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

पुन्हा लॉकडाऊन नाही, पण मास्क घाला : मला अनेकांनी लॉकडाऊन करण्याच्या सूचना केल्या. काही लोकांनी रात्रीची संचारबंदी लावण्याची सूचना केली. हे मी करू शकतो, पण मला करायचे नाही. ती वेळ आणू द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे. युरोप आणि इंग्लंडमध्ये कोरोनाची चौथी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे सावध राहा. राज्यात ७० टक्के लोक मास्क लावून फिरताना दिसतात, पण अजूनही ३० टक्के लोक मास्क लावत नाहीत. त्यामुळे तुम्हीच स्वत:वर काही बंधने लादून घ्या, असे आवाहनही ठाकरेंनी केले.

बातम्या आणखी आहेत...