आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचे पाऊल:पवार दूर करणार समर्थकांची नाराजी; दादांची मात्र वाढणार, नाराज ठाकरेंचे पवारांनाही टोमणे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना समजावताना सुप्रिया सुळे. - Divya Marathi
मुंबईत उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना समजावताना सुप्रिया सुळे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरून दोन दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. नवीन नेतृत्वाच्या निवडीसाठी पवारांनी नेमलेल्या समितीची शुक्रवारी सकाळी मुंबईत बैठक होत आहे. तीत ‘शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन तहहयात पक्षाध्यक्ष राहावे,’ असा एक ओळीचा ठराव ठेवला जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह व समितीच्या ठरावाचा मान राखून पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेतील, अशी शक्यता आहे. ‘कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही,’ असे सांगून त्यांनी तसे संकेतही दिले. तसेच पक्षात कार्याध्यक्षपद निर्माण करून ते सुप्रिया सुळेंकडे सोपवले जाऊ शकते. मात्र या निर्णयामुळे पक्षावर ताबा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असलेले अजित पवार नाराज व त्यांचे समर्थक आमदार होण्याची शक्यता आहे.

नाराज ठाकरेंचे पवारांनाही टोमणे
‘लोक माझे सांगाती’मध्ये पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे ठाकरे नाराज झाले आहेत. म्हणूनच पवारांच्या निवृत्तीवर ते म्हणाले, ‘मी पवारांना कसा सल्ला देणार? अन‌् माझा सल्ला त्यांना पचनी नाही पडला तर काय करू?’

समितीत खडसेंची अचानक एंट्री
नेतृत्व निवडण्यासाठी २० जणांची समिती पवारांनी ठरवली आहे. त्यात अजितदादा व धनंजय मुंडे सोडले तर सर्व जण पवारांचाच शब्द प्रमाण मानणारे आहेत. एकनाथ खडसे यांचा समितीत समावेश नव्हता. मात्र गुरुवारी अचानक त्यांचे नाव पवारांनी समाविष्ट केले.

मी पक्षाच्या भवितव्यासाठी निर्णय घेतला. पण तो घेताना तुमच्याशी चर्चा केली नाही. तुमच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही. दोन दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही. : शरद पवार, वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेर, कार्यकर्त्यांशी बोलताना

सुप्रियाच का?
निवडणुका होईपर्यंत पवार अध्यक्ष राहतील. ते सुप्रियांची राष्ट्रीय नेतृत्वाची प्रतिमा तयार करून देतील. उत्कृष्ट संसदपटू सुप्रियांचा दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क आहे.