आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेते, कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय ७२ तासांत म्हणजे शुक्रवारी (५ मे) सायंकाळी मागे घेतला. २ मे रोजी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची घोषणा करून नवीन नेतृत्व निवडीसाठी समिती जाहीर केली. पण याच समितीने त्यांचा सकाळी राजीनामा फेटाळण्याचा ठराव मंजूर केला व त्यांचा आदर राखत पवारांनीही निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
समितीची बैठक सुरू होण्यापूर्वीच पवार यांनी आपण राजीनामा मागे घेण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. मात्र किमान पुढील काळात तरी लवकरात लवकर आपला उत्तराधिकारी ठरवा, असा निरोप त्यांनी समितीला पाठवला होता, अशी माहिती बैठकीस उपस्थित एका सदस्याने ‘दिव्य मराठी’ला दिली. दरम्यान, सुप्रिया सुळे यांना तूर्त कार्याध्यक्षपद द्यावे अशी सूचना ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. पण पवारांनी ती मान्य केली नाही. त्यामुळे निवड समितीनेही तो प्रस्ताव बैठकीत मांडला नसल्याचे ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
कुणावर काय परिणाम
अजित पवार : पक्ष ताब्यात घेण्याच्या महत्त्वाकांक्षेला ब्रेक. भाजपसोबत जाऊन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांवरही काकांनी फेरले पाणी. आता बंड केले तरी किती आमदार सोबत येतील याविषयी साशंकता. कार्यकर्त्यांचा दादांवर रोष वाढला.
मविआ : आघाडीत फूट पडण्याच्या शक्यतांना ब्रेक लागला. पवारांचे पद कायम राहणार असल्यामुळे उद्धवसेनेचा आत्मविश्वास वाढेल. मात्र आघाडीचे नेतृत्व आता उद्धव ठाकरेंकडून पवारांकडे येऊ शकते.
सुप्रिया सुळे : कार्याध्यक्षपद मिळाले नसले तरी भावी पक्षाध्यक्ष म्हणून पक्षातून कौल मिळवण्यात यशस्वी. राष्ट्रीय राजकारणातूनही सकारात्मक संकेत. या पदासाठी अजून नेतृत्वगुण आत्मसात करण्यासाठी वडिलांच्या तालमीत आणखी तयारी करतील.
२ मे : राजकीय जीवनातून मी निवृत्ती घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदही सोडणार. फक्त सामाजिक कार्यात यापुढे सक्रिय राहणार आहे.
- पक्षात नवे नेतृत्व शोधण्यासाठी निवड समितीची घोषणा. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या त्यांना जाहीर सूचना दिल्या.
- कार्यकर्ते, नेते यांना विचारून निर्णय घेतला असता तर त्यांनी नक्कीच तो मान्य केला नसता. म्हणून फक्त कुटुंबात चर्चा करून निर्णय घेतला. तो आता बदलण्याचा आग्रह करू नका.
- आमच्या पक्षातून कुणीही इतर पक्षांमध्ये जाणार नाही.
५ मे : कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला होता, ही चूक मान्य. आता त्यांच्याच आग्रहामुळे मी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारत आहे.
- पक्षात जबाबदारी विभागून देण्यासाठी कार्याध्यक्षपद निर्माण करण्याचा काही ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला मात्र नाकारला.
- तीन दिवसांपासून देशभरातील नेते, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांच्या विनंतीचा मान राखून मी पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
- जर कुणी पक्ष सोडून जाऊ इच्छित असेल तर त्यांना थांबवणार नाही.
दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी
जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त शुक्रवारी पुण्यातील आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी अजित पवारांचे नैराश्याच्या गर्तेतील व्यंगचित्र रेखाटले. ‘याखाली आता गप्प बसा असे लिहू का’ असा टोमणाही मारला. यापूर्वी राज यांनी अजितदादांना ‘जरा काकांकडेही लक्ष द्या’ असा सल्ला दिला होता. त्यावर दादांनी ‘तुम्ही जसे तुमच्या काकांकडे लक्ष दिले तसे देऊ का?’ असे प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून ही जुगलबंदी सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.