आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर आरोप:आघाडी सरकार अस्थिर करण्याचे केंद्राचे धोरण, शरद पवार यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पवार म्हणाले, तिन्ही सत्ताधारी पक्षांविरोधात सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे केंद्रातील भाजप सरकारचे धोरण आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. बुधवारी तासाभराच्या संवादात पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापे, अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस आणि मावळ ते लखीमपूर हिंसेवर भाष्य करत भाजपला धारेवर धरले.

पवार म्हणाले, तिन्ही सत्ताधारी पक्षांविरोधात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न दाेन वर्षे असफल झाल्यावर तपास यंत्रणांना कामाला लावले आहे. सीबीआय, आयकर, सक्तवसुली संचालनालय, अंमली पदार्थविरोधी विभाग या संस्थांचा राजकीय वापर केला जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर तत्कालीन पोलिस आयुक्तांनी आरोप केले होते. त्यातून देशमुखांनी राजीनामा दिला. देशमुख बाजूला झाले, पण हे गृहस्थ गायब आहेत, असे पवार म्हणाले.

मावळ गोळीबार : मावळमध्ये शेतकरी मृत्युमुखी पडले. त्याला राजकीय पक्षाचे सत्ताधारी जबाबदार नव्हते. मावळात पोलिसांवर आरोप होता. शेतकऱ्यांची सत्ताधाऱ्यांवर नाराजी होती. नंतर तो गैरसमज दूर झाला. म्हणून मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके ९० हजार मतांनी विजयी झाले.

फडणवीसांच्या वक्तव्यात सत्ता गेल्याची वेदना
शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला. पवार म्हणाले, मी चार वर्षे मी मुख्यमंत्री होतो, पण माझ्या लक्षात कधी राहिलेही नाही. मात्र सत्ता गेल्याची त्यांची वेदना किती खोल आहे हे त्यांच्या परवाच्या विधानातून दिसले, असा टोमणा पवारांनी नाव न घेता लगावला.

केंद्राची ॲाफर; पवार कच्च्या गुरूचे चेले नाहीत : पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची आॅफर होती, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. परंतु शरद पवार हे सर्वांचे गुरू आहेत. त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य काहीही झाले की केंद्र सरकरकडे बोट दाखवतात. मग तो कोळसा तुटवडा असो की इतर काहीही असो. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती झाली असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पवार चारदा सीएम, सलग ५ वर्षे एकदाही नाही : देवेंद्र
पणजी | ‘पवार साहेब ४ वेळा मुख्यमंत्री होते, फरक एवढाच की मी सलग ५ वर्षे मुख्यमंत्री राहिलो. ते मोठे नेते आहेत, पण कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरेच झाले असते, त्यांनी चांगलेच काम केले असते. मात्र ते कधी दीड वर्ष, कधी दोन वर्षे असे चार वेळा मुख्यमंत्री राहिले.’

धाडसत्रावर टोमणा : अजीर्ण होईपर्यंत पाहुणचार घेऊ नये अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी टाकलेल्या छाप्यावर पवार म्हणाले, पाहुणे येत असतात. एक-दोन दिवस राहतात. पण त्यांचा आजचा सहावा दिवस आहे, असे सांगून अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये, असा चिमटाही पवार यांनी काढला. लखीमपूर हिंसाचारावर भाष्य : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारावर पवारांनी भाष्य केले. काही लोक गाडीतून येतात आणि शेतकऱ्यांना चिरडतात. असा प्रकार कधी घडला नव्हता. आपल्या मुलाचा संबंध नसल्याचे गृहराज्यमंत्री सांगत होते. मात्र त्यांच्या चिरंजीवाला शेवटी त्यांच्याच पक्षाच्या सरकारलाच अटक करावी लागली.

बातम्या आणखी आहेत...