आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद:सरकारला निवेदन सादर करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्याबाबतच्या व्हायरल व्हिडिओचे आज विधानसभेत पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या व्हिडिओमागचा मास्टरमाइंड शोधून काढण्याची मागणी केली. आमदार भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनीही हा मुद्दा लावून धरला.

सभागृहात आमदार आक्रमक झालेले पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओप्रकरणी सरकारला निवेदन सादर करण्याचे आदेश दिले. दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी हे निवेदन द्यावे लागणार आहे.

नेमके प्रकरण काय?

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी म्हात्रे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ठाकरे गटाचा आयटी सेल या मागे असल्याचा आरोप म्हात्रेंनी केला आहे. मात्र, जे लोक पन्नास खोके खाऊन आपली कामे करतात. त्यांचे व्हिडिओ आम्ही कशासाठी करू, असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे.

विधिमंडळात काय झाले?

शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. आमदार यामिनी जाधव म्हणाल्या, एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल केला.हा प्रकार एका आमदाराबरोबर झाला. उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

आयुष्य बरबाद होईल

आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की, शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओची चौकशी करावी. माझ्यासोबत काम करणाऱ्या आणि नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत हा प्रकार घडला आहे. व्हिडिओ मॉर्फ झाला आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही, असे कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचे. त्यामुळे तिचे आयुष्य बरबाद होईल. ती विवाहित महिला आहे. या कृत्यामागच्या सूत्रधारावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मास्टरमाइंड शोधून काढा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा असे आवाहन केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले.

पोलिसांना आवाहन...

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही याप्रकरणी आपण शीतल म्हात्रेंसोबत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, शीतल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शीतलपुरता मर्यादित नाही. राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. @MumbaiPolice ना आवाहन आहे की, या हरामखोरांना सोडू नकाच, पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तुमची पापे लपवण्यासाठी...

शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओप्रकरणी खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा या व्हिडिओशी संबंध नाही. तुमची पापे लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल, तर ते कायद्याचे राज्य नाही. कोणीही व्हिडिओ काढते. व्हायरल करते. त्याचा आमच्याशी संबंध नाही. पण सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचे अश्लील वर्तन करत असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. व्हिडिओ खरा की खोटा याचा तपास करा. व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करून समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...