आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीसाठी सुंठेवाचून...:राजू शेट्टींचा पत्ता कट, खडसे वेटिंगवर; 12 आमदारांच्या यादीतील 2 नावांवर राज्यपालांची काट

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून पाठवायच्या १२ सदस्यांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळून दुसऱ्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे. तसेच एकनाथ खडसे यांचे नाव वगळायचे की कसे, यावरही पक्षात विचार सुरू असून पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात खडसेंच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू असल्याने त्यांच्या नावावर काट मारली जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस वगळून त्या जागी राष्ट्रवादीने कोणत्या नेत्याची शिफारस केली, याची माहिती मात्र गुलदस्त्यात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (१ सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्या वेळी राजू शेट्टी यांचे नाव वगळून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्याची शिफारस करणारे पत्र राज्यपालांना दिल्याचे खात्रीलायक गोटातून समजते.

राष्ट्रवादीचे दुसरे बडे नेते एकनाथ खडसे यांचे नाव वगळण्याचा प्रस्ताव राजभवनला दिलेला नाही. मात्र खडसे यांचे नाव वगळण्यावर राष्ट्रवादीत गंभीर विचार सुरू आहे. कारण, खडसे यांचे नाव वगळल्याशिवाय दिल्लीतून यादी मंजूर होणे अवघड आहे, असे संकेत राजभवनने राज्य सरकारला दिलेले आहेत.

राज्यपालांनी दिले नीतिमूल्यांचे धडे : आॅगस्टमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दोन नावे वगळून पर्यायी नावे देण्यावर चर्चा झाली होती. त्याप्रश्नी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी राजभवनला जाताना राज्याच्या मुख्य सचिवांना सोबत घेतले. दुसऱ्या नावाची शिफारस करणारे पत्र राज्यपालांना दिले आहे. या भेटीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची राज्यपालांशी ६० मिनिटे चर्चा झाली. या वेळी राज्यपालांनी राजकीय नीतिमूल्यांचे धडे दिल्याचे समजते.

‘स्वाभिमान’ नडला : राजकीय कारकीर्दीत सातत्याने शरद पवार आणि साखर कारखानदारांविरोधात भूमिका मांडणारे म्हणून राजू शेट्टी ओळखले जातात. तसेच त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजप अन् राष्ट्रवादी समसमान आहेत. संघटनेचे सध्या आघाडी सरकारविरोधात ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ आंदोलन सुरू आहे. मात्र आमचे आंदोलन कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही, असा दावा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील (कोल्हापूर) यांनी केला.

एकनाथ खडसे यांच्या नावावर दिल्ली दरबारी आक्षेप
भोसरी भूखंडप्रकरणी ईडी चौकशी आणि राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव महापालिकेत भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावावर दिल्ली दरबारी आक्षेप घेतल्याचे राज्यपालांनी सूचित केले . त्यामुळेच राजू शेट्टीसोबतच खडसेंचे नाव वगळण्याबाबत राष्ट्रवादीतही गंभीरपणे विचार सुरू आहे.

नियमावर बोट ठेवल्यास ऊर्मिला मातोंडकरही ठरेल बाद
नुकत्याच पराभूत उमेदवारांना मागच्या दाराने वरिष्ठ सभागृहात पाठवणे अयोग्य असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी पराभूत झाले होते. विशेष म्हणजे नजीकच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारास राज्यपाल नामनियुक्त म्हणून पाठवता येत नाही, असा कोणताही नियम नाही. तसे असेल तर सध्याच्या १२ नावांच्या यादीतील ऊर्मिला मातोंडकर, यशपाल भिंगे हेसुद्धा बाद ठरतात. कारण ऊर्मिला मातोंडकर, भिंगे निवडणुकीत पराभूत झाले होते.

राजू शेट्टींचे नाव वगळण्याचे राज्यपालांना पत्र, नवे नाव गुलदस्त्यात
नियम तपासून पाहतोय... अजित पवार
: पराभूत उमेदवारास विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून पाठवता येत नसल्याची माहिती पुढे येते आहे. आम्ही ती तपासून पाहत आहाेत. तसे असल्यास विचार करावा लागेल, असे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. मात्र राजू शेट्टींचे नाव वगळल्यास राष्ट्रवादीसाठी ‘सुंठेवाचून खोकला गेला’ असेच ठरणार आहे.

पत्ता का कापला : एकीकडे राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेने सध्या राज्य सरकारविराेधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शेट्टी यांची धोरणे भाजपला पूरक ठरत असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. दुसरीकडे शेट्टी हे भाजपकडून महाविकास आघाडीकडे गेलेले नेते आहेत. त्यामुळे ते भाजपला अप्रिय आहेत. त्यामुळे शेट्टींच्या नावाला दिल्लीतून आक्षेप आहे.

बातम्या आणखी आहेत...