आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचानकपणे चहुबाजूंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातो आहे, हे प्रकरण साधेसोपे नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटे पिरगाळावी, अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मांडली. तर इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. केंद्राने लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सर्व खासदार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमा प्रश्नावर चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. महाविकास आघाडीचे सर्व खासदार आज अमित शहांची भेट घेणार
सीमाभागातील हल्ल्यांमागे भाजप : बाळासाहेब थोरात
कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली महाराष्ट्र सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करून मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले, पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्र सरकारने सीमाभाग केंद्रशासित करावा : राऊत
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपवण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. केंद्र सरकारने तातडीने बेळगावमधील सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा, अशी मागणी सेना संजय राऊत यांनी केली.
कायदेशीर मार्गाने पुढे जायला हवे : बावनकुळे
राज्यात सरकार कुणाचेही असले तरी त्यांनी दगड मारला तर आपण त्यांना वीट मारायची यापेक्षा महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात तत्काळ निकाली निघावे यासाठी प्रयत्न करावे. हाणामारी किंवा तणाव निर्माण करण्यापेक्षा आपण कायदेशीर मार्गाने पुढे जायला हवे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
कोल्हापुरात शनिवारी धरणे आंदोलन :
छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा निषेध व सीमाभागातील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात शनिवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 1 या वेळेत धरणे आंदोलन होणार आहे. या माध्यमातून कोल्हापूरकरांची ताकद सीमाबांधवांच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले जाईल, असा निर्धार आघाडीने केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.