आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरघोडीचा प्रयत्न:शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिंदे सेनेनेही आता परवानगी मागितली, शह देण्याचे राजकारण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची जान अन् शान असलेला दसरा मेळावा हायजॅक करण्याची खेळी सेनेच्या बंडखोर शिंदे गटाने खेळली आहे. शिंदे गटाने सेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर हक्क दाखवत पहिला डाव टाकला होता. पुन्हा या गटाने शिवाजी पार्कवर (शिवतीर्थ) दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीचा अर्ज करत उद्धव ठाकरे यांच्यावर दुसरा डाव टाकला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्कमध्ये यंदा (५ ऑक्टोबर) दसरा मेळावा आयोजित करून थांबणार नाहीत, तर ते मेळाव्याच्या व्यासपीठावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आमंत्रित करू शकतात, असे समजते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पत्ता आपोआप कट होईल. तसेच मेळाव्यात ठाकरे घराण्याचा वारसा सांगणाऱ्या व्यक्तीची उणीव जाणवणार नाही.

सरवणकर म्हणतात, हिंदुत्वाबद्दल आस्था असलेल्यांना निमंत्रण

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही दसरा मेळाव्याला इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते. यामध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि शरद पवार यांचाही समावेश होता. एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना व्यासपीठावर आमंत्रित करू शकतात.

हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या कोणत्या नेत्याला दसरा मेळाव्याला बोलावले जाऊ शकते. ज्यांना हिंदुत्वाबद्दल आस्था आहे अशांना मेळाव्याला बोलावले जाईल, असे शिंदे गटाचे आमदार व मेळाव्यासाठी अर्ज करणारे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाहेरच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे आता मनसेचे नेते राज ठाकरे यांना बोलावण्यास काहीही हरकत नाही, असा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

सेनेकडून आमदार अनिल परब यांनी 22 ऑगस्ट रोजी तर शिंदे गटाकडून 30 ऑगस्ट रोजी पालिकेकडे शिवाजी पार्क मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे. पालिकेवर सध्या प्रशासक आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री जे म्हणतील त्याला पार्क मिळणार आहे.

काय परंपरा :
शिवसेनेची स्थापना 1966 ची तेव्हापासून शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे अतूट समीकरण बनले आहे. बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना नवा कार्यक्रम द्यायचे. विचारांचे सोने लुटण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर हजारो शिवसैनिक आवर्जून येत. कोरोनामुळे दोन वर्ष दसरा मेळावा आॅनलाइन झाला. 2006 मध्ये पावसामुळे तर 2009 मध्ये निवडणुकांमुळे मेळावा झाला नव्हता. या मेळाव्यात प्रथेप्रमाणे प्रथम शस्त्रपूजा होते. त्यानंतर भाषणे होतात.

शिंदे-ठाकरे गटाची धावपळ
सध्या मुंबईतील गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडणे हे आमचे प्राधान्यस्थानी आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर अर्जावर योग्य निर्णय घेऊ. -प्रशांत सपकाळे, पालिका सहायक आयुक्त (जी नॉर्थ)

यंदाही दसरा मेळाव्यासाठी मी अर्ज केला आहे. शिवसेनेमध्ये कोणतेही गटतट नसून एकच शिवसेना आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील. -सदा सरवणकर, आमदार, दादर

आतापर्यंत विभागप्रमुख व स्थानिक आमदार म्हणून शिवसेनेकडून सरवणकर मेळाव्यासाठी अर्ज करत. आता त्यांना मेळाव्यासाठी असा अर्ज करण्याचा अधिकार नाही. - मनीषा कायंदे, शिवसेना आमदार

बातम्या आणखी आहेत...