आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंचा दावा:शिंदेंना 20 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, तरीही केली बंडखोरी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गेल्या २० मे रोजी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा दावा मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना मेळाव्यात केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना वर्षावर बोलावले होते आणि मुख्यमंत्री व्हायचे का? असे विचारले होते. पण रडारडी केली, या फाइल थांबवल्या, त्या फाइल थांबवल्या असे म्हटले होते आणि ऑफरनंतरही बंड केले, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

बंडखोरांना आव्हान देत आदित्य ठाकरे म्हणाले की, मी चॅलेंज देतो की, या आणि आमच्यासमोर येऊन बसा. मी त्यांना काहीही बोलणार नाही. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार. पण त्यांनी डोळ्यात डोळे घालून सांगावे की आम्ही काय कमी केले आणि यांनी असे का केले, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे प्रत्येकावर लक्ष असते. त्यांनी सर्वांना न्याय दिला. मात्र, त्यांनीच आज शिवसेनेला धोका दिला. या बंडखोरांची आज अशी स्थिती झाली की त्यांना आरशात सुद्धा पाहायला लाज वाटते. ज्यांना जायचे आहे त्यांना दरवाजे खुले आहेत आणि ज्यांना शिवसेनेत यायचे आहे, त्यांनाही दरवाजे खुले आहेत. पण जे विकले गेलेत त्यांना दरवाजे बंदच राहातील. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा, असे आव्हानच ठाकरे यांनी दिले.

बंडखोर आमदारांचा राग नाही तर हसायला येते
आदित्य म्हणाले की, आम्हीच शिवसेना, आमचाच धनुष्यबाण, आम्हीच बाळासाहेब असे सांगतात. पण इतकीच लायकी असती, स्वाभिमान असता आणि लाज असती तर हे सुरतला पळाले असते का? थेट सांगायचे होते की मला मुख्यमंत्री बनवा. पण हिंमत नव्हती म्हणून आधी सुरत आणि मग गुवाहाटीमध्ये पळाले. बंड करायचेच होते तर मुंबईत करायचे असता. सुरतला पळून जाण्याची गरज नव्हती. तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. तुम्हाला पळून जाणे शोभत नाही. सुरतवरून गुवाहाटीत पळून गेले. येथे येऊन बोला, त्यांचा राग नाही तर हसायला येत आहे, की यांचा काय जोक झाला आहे.