आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंपेक्षा शिंदेंचाच आवाज मोठा:बीकेसी मैदानावर शिंदेंच्या एन्ट्रीला तर शिवतीर्थावर पेडणेकरांच्या भाषणाने सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत बुधवारी पार पडलेल्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आवाज फाऊंडेशनच्या पाहणीतून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या मेळाव्यांवर या प्रकरणी काही कारवाई केली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

शिवाजी पार्कवर ढोल वादनाच्या आवाजाची तीव्रता सर्वाधिक 101.6 डेसिबल इतकी होती. तर किशोरी पेडणेकरांच्या भाषणाची तीव्रता सर्वाधिक 97 डेसिबल होती. तर बीकेसी मैदानात एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीला सर्वाधिक 91.6 डेसिबल इतकी तीव्रता नोंदवण्यात आली.

शिंदेंच्या भाषणाचा आवाज ठाकरेंपेक्षा मोठा

वैयक्तित भाषणाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा आवाज उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या तीव्रतेपेक्षा जास्त होता. शिंदेंच्या भाषणाच्या आवाजाची सर्वाधिक तीव्रता 89.6 डेसिबल तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सर्वाधिक तीव्रता 88.4 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली.

शिवाजी पार्कवर 101.6 डेसिबल आवाज
पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारी संस्था आवाज फाऊंडेशनने बुधवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी विविध वेळी आवाजाच्या तीव्रता सातत्याने मोजली. यानुसार शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यादरम्यान सायंकाळी 5.40 वाजता सर्वाधिक 101.6 डेसिबल इतकी आवाजाची तीव्रता नोंदवली गेली. हा आवाज शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ वाजणाऱ्या ढोलचा होता. तर उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान 7.49 वाजता 88.4 डेसिबल इतकी आवाजाची सर्वोच्च तीव्रता नोंदवली गेली.

किशोरी पेडणेकरांचा आवाज सर्वाधिक
शिवाजी पार्कवर भाषणे दिलेल्या नेत्यांमध्ये किशोरी पेडणेकरांच्या भाषणाच्या आवाजाची तीव्रता सर्वाधिक होती. त्यांच्या भाषणाच्या आवाजाची सर्वाधिक तीव्रता 97 डेसिबल इतकी होती. तर त्याखालोखाल आंबादास दानवेंच्या भाषणाच्या आवाजाची तीव्रता 96.6 डेसिबल, सुषमा अंधारेंच्या भाषणाच्या आवाजाची तीव्रता 93.6 डेसिबल, नितीन देशमुखांच्या भाषणाच्या आवाजाची तीव्रता 93.5 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली.

शिंदे गटाचा सर्वाधिक आवाज 91.6 डेसिबल
याशिवाय वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर पार पडलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात आवाजाची सर्वाधिक तीव्रता 91.6 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली. सायंकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर आले असता येथील आवाजाची ही सर्वाधिक तीव्रता नोंदवली गेली. एकनाथ शिंदेंच्या भाषणादरम्यान रात्री 9.30 वाजता आवाजाची तीव्रता 89.6 डेसिबल इतकी नोंदवली गेली.

शिंदे गटातील नेत्यांमध्ये धैर्यशील मानेंचा आवाज मोठ्ठा
शिंदे गटाकडून भाषणे करणाऱ्या नेत्यांपैकी सर्वाधिक आवाजाची तीव्रता खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणादरम्यान 88.5 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली. त्याखालोखाल किरण पावस्कर यांच्या भाषणाच्या आवाजाची तीव्रता 88.5 डेसिबल, तर मंत्री गुलाबराव पाटलांच्या भाषणाच्या आवाजाची तीव्रता 86 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली.

शिवाजी पार्कवरील आवाजाच्या पातळीचा रिपोर्ट.
शिवाजी पार्कवरील आवाजाच्या पातळीचा रिपोर्ट.
बीकेसीवरील आवाजाच्या पातळीचा रिपोर्ट.
बीकेसीवरील आवाजाच्या पातळीचा रिपोर्ट.

2019 मध्ये 93.9 डेसिबल आवाज
शिवाजी पार्कमध्ये 2019 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आवाजाची सर्वाधिक तीव्रता 93.9 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली होती. विशेष म्हणजे ही आवाजाची सर्वाधिक तीव्रता एकनाथ शिंदेंच्या भाषणादरम्यान नोंदवण्यात आली होती.

2019 मधील आवाजाच्या पातळीचा रिपोर्ट.
2019 मधील आवाजाच्या पातळीचा रिपोर्ट.

आवाज फाऊंडेशनबद्दल

आवाज फाऊंडेशनच्या प्रमुख सुमायरा अब्दुलाली यांनी ही माहिती दिली. आवाज फाऊंडेशन ही पर्यावरणासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली होती. मुंबईला संस्थेचे मुख्यालय आहे

आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली.
आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली.
बातम्या आणखी आहेत...