आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासततच्या बैठका, दौऱ्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती गुरुवारी बिघडली. यामुळे शिंदे यांच्या सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीकडे वरिष्ठांच्या भेटीसाठी रवाना झाले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते.
१५ ऑगस्टपूर्वी विस्तार होणारच : मुनगंटीवार
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रोज नवीन दावे होत आहेत. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १५ ऑगस्टपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा दावा केला आहे. अमृतमहोत्सवी वर्षात झेंडावंदन करण्याआधी सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या शपथविधीची नेमकी तारीख सांगता येत नसली तरी येत्या १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे ते म्हणाले.
सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे यांनी अनेक दौरे आणि बैठका घेतल्या आहेत. पहाटेपर्यंतच्या सभा, पूरग्रस्त भागाची पाहणी आणि प्रवास यामुळे त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, दुसरीकडे शिंदे यांना सोडून फडणवीस दिल्लीकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला असला तरी शिंदे आणि फडणवीस हे दोघेच राज्याचा गाडा हाकत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न विरोधक वारंवार विचारत आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजप नेते लवकरच विस्तार होईल, असा दावा करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.