आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासात प्रथमच:साईबाबा मंदिराची काकड आरती भोंग्याविनाच, भाविक नाराज; मुंबईतील 26 मशिदींची अजानही शांततेत

औरंगाबाद/मुंबई/रत्नागिरी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात भोंग्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच बुधवारी रात्रीची शेजारती व पहाटेची काकड आरती लाऊडस्पीकरशिवाय झाली. यापुढेदेखील साईबाबा मंदिराची पहाटेची काकड आरती आणि रात्री 10 वाजेनंतर होणारी शेजारती आता लाऊडस्पीकरशिवाय पार पडणार आहे. पोलिसांनी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला लाऊडस्पीकरची परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, राज यांच्या इशाऱ्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईतील 26 मशिदींच्या मौलवींनी बैठक घेत भोंग्याच्या वापराबाबत चर्चा केली. बैठकीत पहाटेची अजान भोंग्याविना करण्याचा निर्णय मौलवींनी घेतला आहे. मालाड, मालवणीसह मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा भागातील मशिदींचे मौलवी या बैठकीत सहभागी झाले होते. पोलिसदेखील या बैठकीत सहभागी झाले होते. चर्चेनंतर भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार असल्याचे मौलवींनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर आज या मशिदींची पहाटेची अजान ही भोंग्याविना पार पडली. भोंग्यांवरून वाद निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही अनेक ठिकाणी मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

शिर्डी मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद करू नका, मुस्लिम समाजाची मागणी
आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेल्या साईबाबा समाधी मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद करू नका, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली. शिर्डीतील सर्व मशिदीत नमाज झाली, परंतु अजानसाठी भोंग्याचा वापर केला नाही. साईबाबा समाधी मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावेत अशी मागणी शिर्डी येथील जामा मशीद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली.

रत्नागिरीतही पहाटेची अजान भोंग्यावरून नाही
रत्नागिरी शहरातील मशिदींवर पहाटेची अजाण भोंग्यावर होणार नाही, असे मशिदींच्या विश्वस्तांनी जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शहरातील जमातुल मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष शकिल मुर्तझा यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार पहाटेनंतरच्या अजानसुद्धा निर्धारीत आवाजातच होतील, असे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...