आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Shiv Jayanti 2022 | Marathi News | Sambhaji Raje Bhosle | Fort Conservation Should Be Enriched By Lokashraya; Raje Says, I Was Born In The House Of Chhatrapati Only Yoga, True Credit To Shiva Lovers

शिवजयंती विशेष:लोकाश्रयाने समृद्ध व्हावे दुर्ग संवर्धन; राजे म्हणतात, मी छत्रपतींच्या घरी जन्माला आलो हा फक्त योग, खरे श्रेय शिवप्रेमींचे

दीप्ती राऊत, रायगड6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

रांगडेपणा... ही मराठेशाहीची ताकद होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची पद्धतही. त्या रांगडेपणाचे आदर्श उदाहरण म्हणजे स्वराज्याची राजधानी असलेला रायगड. रायगडाचं हे वैभव आपल्याला येणाऱ्या पिढीपर्यंत टिकवायचंय आणि जगाच्या पाठीवर पोहोचवायचंय... ', छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज, महाराष्ट्राचे गड-किल्ल्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर, राष्ट्रपतीनियुक्त खासदार आणि महाराष्ट्र शासनाच्या रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे सांगत होते. दरबारी पोषाखापलीकडे जाऊन टी शर्ट, जीन्स, शूज आणि कॅप अशा वेषात रायगडावरील लाल मातीच्या वाटा तुडवत होते, छत्रपतींच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या आणि सैनिकी स्थापत्याचा आदर्श नमुना असलेल्या रायगडाच्या खाणाखुणा समजावून सांगत होते.

एका बाजूला संवर्धनाच्या कामाबद्दल शासकीय अधिकाऱ्यांना सूचना देत होते आणि दुसऱ्या बाजूला गडावर आलेल्या शिवप्रेमींना, पर्यटकांना फोटो देत होते. ऊन डोक्यावर घेत, घामाच्या धारा लागल्या होत्या. पण लोकांचा फोटो काढण्याचा उत्साह संपत नव्हता आणि ते देखील प्रत्येकाला वेळ देत होते, फोटो काढून देत होते... ‘फोटोशिवाय काय देऊ शकतो मी त्यांना ?', त्यांचे हे शब्दच त्यांच्यातील "छत्रपती'पण सांगत होते.

गडावरच्या बाजारपेठेतून आम्ही चाललो होतो. तेथे नाशिकहून आलेल्या सह्याद्री शिवस्वराज्य ग्रुपचे कार्यकर्ते सकाळपासून थांबले होते. यंदाच्या शिवजयंतीला राजेंच्या हातची गडावरची माती घेऊन जाण्यासाठी ते चार तासांपासून थांबले होते. अकलूजवरून आलेल्या शिवभक्त मंडळाला शिवज्योतीसाठी राजेंचा आशीर्वाद हवा होता. नगारखान्यापाशी छत्रपती संभाजीराजेंवर माहितीपट तयार केलेला कलाकारांचा ग्रुप राजेंच्या हस्ते प्रोमोच्या उद्घाटनासाठी थांबला होता. प्रत्येकाला वेळ देत राजे त्यांचे समाधान करत होते, फक्त पाया पडू नका असे विनवत होते.

गडावरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, स्थानिकांना रोजगार आणि पर्यटकांना सेवा देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल पोटतिडकीने बोलत होते. गडावरच्या संवर्धनाच्या कामाबद्दल अधिक माहितीसाठी कॉन्झर्वेशन आर्किटेकटवरून भामरे यांना बोलायला सांगत होते तर एेतिहासिक संदर्भ निघताच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत याच्याकडून पुरावे समजून घेत होते.

"मी छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आलो हा फक्त योग. खरे श्रेय मला मोठे करणाऱ्या शिवप्रेमींचे. रायगडाचे संवर्धन ही फक्त सुरुवात आहे. येथे आम्ही गडकिल्ल्यांच्या विकासाचे आदर्श मॉडेल तयार करीत आहोत. या धर्तीवर महाराष्ट्रातील ५० किल्ल्यांचा आपण शास्त्रोक्त व शाश्वत पद्धतीने विकास करू शकतो हे उदाहरण समोर ठेवून शिवकालीन गडकिल्ल्यांना जगाच्या नकाशावर पोहोचवू शकतो. यात खूप हात गुंतले आहेत. त्यातला मी एक मावळा फक्त.. राजे सांगत होते.

केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे गडाची मालकी मात्र राज्य सरकारतर्फे विकास, असे संवर्धनाचे देशातील पहिले मॉडेल रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडावर उभे राहिले आहे. ६५० कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. शासनाचे सर्व विभाग एकत्रपणे याठिकाणी कार्यरत आहेत. शिवकालीन इतिहास जतन व्हावा, लोकांपर्यंत पोहोचावा आणि पर्यटक, शिवप्रेमी आणि अभ्यासक यांची संख्या वाढावी यासाठी हा ऐवज खुला करण्यात येणार आहे.

रायगड विकास प्राधिकरणातर्फे संवर्धनाची कामे

 • गडावरील ३५० वाड्यांचा शोध
 • तलाव, टाके अशा ८४ पाणवठ्यांची दुरुस्ती
 • हत्ती तलाव, फुटका तलाव यांच्या पुरातन भिंतींची पुनर्बांधणी
 • गडाभोवतीच्या ५ संरक्षक भिंतींचे पुनर्निर्माण
 • घेऱ्यातील गावांसह गडावरील १२०० एकर जमिनीचे सर्वेक्षण
 • गडावरील वाटा, माँसाहेबांच्या समाधी स्थळाभोवतीची फरसबंद
 • राजसदरेवरील जमिनीचे पूर्ववत संवर्धन
 • अशा आहेत भविष्यातील योजना
 • स्वराज्याचा इतिहास सांगणारा लाइट अँड साउंड शो
 • स्थानिकांना रोजगार व पर्यटकांसाठी सेवा यासाठी मराठमोळ्या पदार्थांचे स्टॉल्स
 • उत्खननात सापडलेल्या पुरातन ऐवजांचे संग्रहालय व संदर्भालय
 • माँसाहेबांचा वाडा ते रायगड दरम्यान शिवसृष्टी
 • शिवकालीन रचनेनुसार चित्त दरवाजाची पुनर्बांधणी
 • अष्टप्रधान मंडळांच्या वाड्यांची बांधणी
 • मराठा सैनिकी स्थापत्य रचनेचे दस्तऐवजीकरण.
 • रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कामात लागला ३५० वाड्यांचा शोध
 • राजे म्हणतात, मी छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आलो हा फक्त योग, खरे श्रेय शिवप्रेमींचे
बातम्या आणखी आहेत...