आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिस्चार्जनंतर नवनीत राणांचा माध्यमांशी संवाद:जामिनाच्या प्रमुख अटीचे उल्लंघन केल्याचा शिवसेनेचा आरोप, कारवाई होण्याची शक्यता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर येताच पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हनुमान चालिसासाठी मी 14 दिवसच काय 14 वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे, असे वक्तव्य करत हनुमान चालिसा म्हणणे गुन्हा आहे का? मला महाविकास आघाडी सरकारने कोणत्या चुकीची शिक्षा दिली? , असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंमत असेल तर त्यांनी राज्यातील कोणताही जिल्हा निवडावा व त्या जिल्ह्यात माझ्याविरोधात निवडणुकीला उभे राहून दाखवावे, असे आव्हानच नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. या वक्तव्यांमुळे मात्र नवनीत राणा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजद्रोहप्रकरणी दाखल गुन्ह्याबाबत माध्यमांसमोर कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नये, अशी सक्त ताकिद मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिली होती. या प्रमुख अटीवरच 50 हजारांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला होता. मात्र, आज राणांनी या अटीचे उल्लंघन केले, असा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे.

कोर्टाची अवमानना केल्याचे सिद्ध झाल्यास पुन्हा कोठडी - मनीषा कायंदे, शिवसेना नेत्या
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी याबाबत सांगितले आहे की, जामिनानंतर हनुमान चालिसावादासंबंधी माध्यमांना बाईट द्यायची नाही. या वादावर कोणतीही वाच्यता करायची नाही, अशी सक्त ताकिद राणा दाम्पत्याला सत्र न्यायालायने दिली होती. मात्र, आज पुन्हा त्यांनी तीच नौटंकी करत कोर्टाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. कोर्टात हे सिद्ध झाल्यास राणा दाम्पत्याला पुन्हा कोठडीत किंवा हॉस्पिटलमध्ये विश्रांती घ्यावी लागेल, असा इशाराही कायंदे यांनी दिला आहे.

या 4 अटींवर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन मजूंर केला होता

  • राणा दाम्पत्याने चौकशीत सहभागी होत राहावे
  • अशा प्रकारचे आणखी कोणतेही वादविवाद करू नये
  • पुराव्यांशी छेडछाड करू नये
  • या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही

राणांविरोधात उद्या कोर्टात याचिका दाखल होण्याची शक्यता
मिडिया रिपोर्टनुसार, नवनीत राणा व रवी राणा यांनी आज पत्रकारांसमोर जी वक्तव्ये केली, त्याची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी राणांच्या सर्व वक्तव्यांची नोंद केली असून ते सरकारी वकिलांकडे पाठवण्यात येणार आहे. राणा दाम्पत्याने कोर्टाच्या अटींचे उल्लंघन केले की नाही, याचा तपास सरकारी वकिल करणार आहेत. त्यानंतर उद्या किंवा परवा कोर्टाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करावा, असा अर्ज मुंबई पोलिसांकडून कोर्टात दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

...तर राणा दाम्पत्याचा जामीन होऊ शकतो रद्द!
4 अटींवर सत्र न्यायालायने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. तसेच, या अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्यासाठी मुंबई पोलिस कोर्टात धाव घेऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आता मुंबई पोलिस लवकरच कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे. या सुनावणीत राणा दाम्पत्याने सत्र न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचा जामीन रद्द होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याची रवानगी पुन्हा कोठडीत केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, यासाठी शिवसेना व सरकारी वकिलांकडून सध्या राणा दाम्पत्याच्या वक्तव्यांचा कसून अभ्यास सुरू आहे.

राणांच्या खाजेवर आमच्याकडे औषध आहे - किशोरी पेडणेकर
नवनीत राणा यांनी आज मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवनीत राणांचे वर्तन खासदारासारखे हवे. पण बबली अजून मोठी झालीच नाही, हे स्पष्ट दिसत असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. तसेच, राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला केलेला नाही. ही तर त्यांची केवळ खाज असल्याचे पेडणेकर म्हणाले. या खाजेवर आमच्याकडे औषध आहे. आम्ही त्यांना कायद्यानेच प्रत्युत्तर देऊ, असे पेडणेकर यांंनी म्हटले आहे. तसेच, 14 वर्षे तुरुंगात राहू वगैरे बोलायला सोपे असते. मात्र वेळ येईल तेव्हा तुम्हाला त्याची खरी समज येईल, असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...