आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागौतम अदानी व त्यांच्या आर्थिक साम्राज्याचा फुगा साफ फुटला, पण गोदी मीडिया महत्त्व देत आहे ते अमेरिकेने त्यांच्या मिसाईलने चीनचा जो जासुसी फुगा फोडला त्यास. अदानी फुग्यापेक्षा चीनच्या फुग्यास महत्त्व देणारा गोदी मीडिया हे देशासमोरचे एक संकट आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आज टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, अदानी यांच्या आर्थिक साम्राज्यात भाजपने हवा भरली. यात राष्ट्रवाद, हिंदुत्वाचा वगैरे प्रश्न येतोच कुठे? पण संघास असे वाटते की, अदानींचा फुगा फोडण्यामागे आंतरराष्ट्रीय तसेच देशद्रोही शक्ती आहेत. ज्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारांनी अदानी प्रकरणावर परखड भाष्य केले, त्या सगळ्यांना परकीय हस्तक किंवा देशद्रोही ठरवण्यात येत आहे.
अदानींविरोधात लिहू नये अशी तजवीज
अग्रलेखात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे आर्थिक संरक्षक गौतम अदानी यांच्या बाबतीत देशातले वातावरण खदखदते आहे. याप्रकरणी मीडियाने लिहू नये किंवा बोलू नये अशी तजवीज करण्यात आली आहे. तसे स्पष्ट दिसत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे व विरोधकांनी लोकसभा तसेच राज्यसभेचे कामकाज रोखून धरले आहे, पण ज्यास ‘गोदी मीडिया’ म्हटले जाते ते सर्व लोक वेगळय़ाच विश्वात वावरताना दिसत आहेत. मिंधे फक्त महाराष्ट्रातच नाहीत, तर ते इतरत्रही आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही शांत
अग्रलेखात म्हटले आहे की, अदानी यांच्यामुळे एलआयसी व भारतीय स्टेट बँकेचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी मागणी विरोधक करीत आहेत, पण पंतप्रधान मौन बाळगून आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चेष्टा ‘मौनीबाबा’ म्हणून करणाऱयांकडून असे मौन बाळगणे जरा रहस्यमय आहे. अदानी प्रकरणात पंतप्रधानांनी ‘मन की बात’ व्यक्त करावी, निदान ‘मन की भडास’ व्यक्त करून विरोधकांवर हल्ला करावा, तर तेदेखील नाही. मग सरकार काय करते आहे? सरकार याप्रश्नी विरोधकांत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
विरोधकांनी एकजुटीची वज्रमुठ करावी
अग्रलेखात म्हटले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्राच्या बरोबरीने सगळय़ात जास्त उच्छाद मांडला तो पश्चिम बंगालात. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही छळ सुरूच आहे, पण या सर्व तपास यंत्रणा हिंडेनबर्गने फोडलेल्या फुग्याच्या बाबतीत गप्प आहेत. ममता व त्यांच्या पक्षाची लोकसभेत चांगली ताकद आहे व ते बहुधा याप्रश्नी कुंपणावर बसून आहेत. हे रहस्यच आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेस व झुंझारपणास हे शोभणारे नाही.
ममता यांचे भांडण काँग्रेस पक्षाशी असू शकेल, पण हिंडेनबर्गने फोडलेला फुगा हा राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाचा विषय आहे. भाजप व त्यांच्या दैवतांचे मुखवटेच आता गळून पडले. ममता बॅनर्जी यांना बदनाम करणाऱया, त्यांचे सरकार अस्थिर करू पाहणाऱया या शक्तींना ताकद मिळेल असे वर्तन आता होऊ नये. विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ हेच मोदी सरकारविरोधी सगळय़ात प्रखर हत्यार आहे.
अदानींचा फुगा आता फुटला आहे
अग्रलेखात म्हटले आहे की, विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ हेच मोदी सरकारविरोधी सगळय़ात प्रखर हत्यार आहे. ते हत्यार बोथट करण्याचे, वज्रमूठ ढिली करण्याचे काम केंद्र सरकार करीत असले तरी ते यशस्वी होता कामा नये. मोदींचे सरकार प्रथमच संकटांच्या कोंडीत सापडले आहे, बदनाम झाले आहे. जनता हिशेब मागत आहे व मोदी यांची ‘मन की बात’ शांत आहे. अशा वेळेला विरोधी पक्षास शांत राहून कसे चालेल? ‘अदानी’ हा फुगा फुटला आहे. फुटलेल्या फुग्यात हवा भरण्याचे पाप निदान विरोधकांनी तरी करू नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.