आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांना टोला:नाणार प्रकल्प केला तर भराडी देवाची कोप होईल, तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे बळी जाईल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाणारचा प्रकल्प करू नका, असा भराडी देवीचाच कौल आहे व तो कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे बळी जाईल, असा टोला शिवसेनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

आज शिवसेनेचे मुखपत्र सामनात म्हटले आहे की, या वेळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे राजकीय भालदार, चोपदार असे असंख्य लोक भराडी देवीच्या दरबारात गेले. तेथे राजकीय सभा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच शिवसेना व ‘ठाकऱ्यां’वर टीका केली. कोकणात रिफायनरी आणणारच असे त्यांनी गर्जून सांगितले. फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते?

रिफायनरीविरुद्ध खोटा प्रचार

अग्रलेखात म्हटले आहे की, आंगणेवाडीतील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले, ‘‘नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांची दिशाभूल केली गेली. हा प्रकल्प आणला तर आंबे येणार नाहीत असे खोटे सांगितले गेले. मच्छीमारांना सांगितलं गेलं की, मच्छीमारी होणार नाही. रिफायनरीविरुद्ध खोटा प्रचार करून कोकणचे नुकसान केले. आता आम्ही कोकणात रिफायनरी आणणारच!’’ फडणवीस यांनी असा पहेलवानकी षड्डू आंगणेवाडीच्या जत्रेत ठोकला. फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व 2024 सालाआधीच त्यांचे ‘रेडे’ सरकार कोसळणार याची खात्री पटल्याने ते थयथयाट करीत आहेत.

कोकणच्या मुळावर उठलेत

पुढे अग्रलेखात म्हटले की, रिफायनरी हवी की नको हे जनता ठरवेल. जनतेच्या फळबागा, शेती, मासेमारी कायमची संपवून कोणी विकासाची भाषा करणार असेल तर तो कोकणी जनतेला संपवण्याचा डाव आहे. कोकणात वायुप्रदूषण व जलप्रदूषण वाढवणारेच प्रकल्प का आणता? अशा प्रकल्पांमुळे तारापूरसारख्या भागात काय हाहाकार माजला आहे ते पहा. कर्करोगाचे प्रमाण तेथे वाढले आहे की नाही हे भराडी मातेची शपथ घेऊन सांगा. सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत की नाही, हे जरा सत्य बोला. पहिले म्हणजे नाणार रिफायनरी कोकणात आणण्यापेक्षा गुजरातने महाराष्ट्रातून पळवून नेलेला वेदांत फॉक्सकॉन, एअरबस, ड्रग्स पार्कसारखे प्रकल्प पुन्हा खेचून घेऊन या व त्यातला एखादा मोठा प्रकल्प नाणारात उभा करा. तेथेच नाणार प्रकल्प येणार म्हणून शेकडो परप्रांतीय उद्योगपती व व्यापाऱ्यांनी कोकणात नाणारच्या आसपास जमिनी खरेदी केल्या. नाणार आणला नाही तर या सगळय़ांचे नुकसान होईल. हे सर्व परप्रांतीय जमीनदार भाजपचे अर्थपुरवठादार म्हणजे छोटे ‘अदानी’ असल्याने फडणवीस त्यांच्या फायद्याची भाषा बोलत आहेत. कोकणची संस्कृती नष्ट करणारे हे जमीनदार व त्यांची पाठराखण करणारे फडणवीस व त्यांचे सरकार हेच कोकणच्या मुळावर उठले आहेत.

भराडी देवीच्या साक्षीने थाप मारली

अग्रलेखात म्हटले की, भराडी देवी गद्दारांची नसून ‘सत्यव्रतां’ची आहे. नाणारचा प्रकल्प करू नका असा भराडी देवीचाच कौल आहे व तो कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल. इतके ते जागरूक देवस्थान आहे. अदानींच्या घोटाळय़ामुळे देशाचे, बँकांचे, एलआयसीचे अजिबात नुकसान झाले नाही अशी ऐतिहासिक थाप ज्या पद्धतीने अर्थमंत्री निर्मलाताईंनी मारली, त्याच बेमालूम पद्धतीने फडणवीस यांनी भराडी देवीच्या साक्षीने नाणार रिफायनरीबाबत थाप मारली! कोकणात पाप व ढोंग चालत नाहीत. ही कोकणची परंपरा नाही. श्री देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेडयांप्रमाणे बळी जाईल!

बातम्या आणखी आहेत...