आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची मोदी सरकारवर टीका:इंधन दरकपातीच्या पुंगीवर आता जनता डोलणार नाही, 8 वर्षांपासून देशात जुमलेबाजीच सुरू

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकतेच ‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा,’ असे आवाहन पेट्रोलियम कंपन्यांना केले आहे. त्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंधन दरकपातीची ‘पुंगी’ वाजवून जनतेला गुंगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुंगीवर जनता डोलणार नाही. कारण ही मोदी सरकारची ‘जुमलेबाजी’ आहे, हे जनता ओळखून आहे.

इंधन दरवाढ आणि महागाई हा जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्याबाबत पतंगबाजी करू नका. नाहीतर जनता तुमच्या सरकारचा कधी ‘कटी पतंग’ करेल, हे तुम्हालाही समजणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

जनतेने हसायचे की रडायचे?

अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, आकाशाला भिडलेले पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, अशी मागणी सामान्य जनता आणि विरोधी पक्ष नेहमीच करीत असतात. मात्र ज्यांनी ही दरवाढ रोखायची, ती कमी करायची ते सरकारमधील मंत्रीच ही मागणी करू लागले तर त्याला काय म्हणायचे? जनतेने हसायचे की रडायचे? तशी वेळ केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जनतेवर आणली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात ‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा,’ असे आवाहन पुरी यांनी पेट्रोलियम कंपन्यांना केले. पुन्हा त्याच वेळी नजीकच्या भविष्यात हे दर कमी होण्याची शक्यता नाही, अशी पुस्तीही जोडली. एकीकडे ते म्हणतात, ‘दर कमी करा,’ तर दुसरीकडे ‘नजीकच्या भविष्यात ते शक्य दिसत नाही,’ असेही सांगतात. सामान्य जनतेने या दोन्ही वाक्यांचा अर्थ काय आणि कसा लावायचा? दर कमी करा, असे सांगितले म्हणून हसायचे, की तशी शक्यता नाही ही वस्तुस्थिती सांगून निराशा केली म्हणून रडायचे? पेट्रोलियम कंपन्यांना विनंती केली म्हणून सुस्कारा टाकायचा की त्या आशेवर पाणी फेरले म्हणून उसासा टाकायचा? महागाईच्या भळभळत्या जखमेवर फुंकर मारता येत नसेल तर मीठ तरी का टाकता?

भ्रम दाखवण्याचे उद्योग करु नका

शिवसेनेने म्हटले आहे की, इंधन दरकपातीची सरकारलाच इच्छाशक्ती नाही, हे जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यामुळे उगाच अपेक्षेचे फुगे आकाशात का सोडत आहात? पुन्हा हा अधिकार कंपन्यांचा आहे, असे सांगून अंग काढून घेण्याचा दुटप्पीपणा कशासाठी करीत आहात? इंधन दरांबाबत पेट्रोलियम कंपन्यांकडेच बोट दाखविणार असाल तर सरकार म्हणून तुमचा अधिकार काय? ही दरवाढ आणि महागाई कमी होईल, या भ्रमात जनता अजिबात नाही. तेव्हा त्या भ्रमाचा भोपळा जनतेला दाखविण्याचे उद्योग करू नका.

कंपन्यांना सरकार म्हणून दणका द्या!

शिवसेनेने म्हटले आहे की, मध्यंतरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘सरकारची महागाईवर करडी नजर आहे’ अशा शब्दांत महागाईसंदर्भात केंद्र सरकार किती ‘गंभीर’ आहे, हे दाखवून दिले होते. त्यांच्या या करड्या नजरेने महागाई थरथर कापली नाहीच, उलट अधिक धिटाईने आजही ती सरकार आणि जनतेसमोर उभीच आहे. आता पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील इंधन दराबाबत हवेतली तलवारबाजीच केली. मोदी सरकार हे आजपर्यंतचे देशातील सर्वात कणखर वगैरे सरकार असल्याचे तुम्हीच सांगत असता ना, मग इंधन दरकपातीबाबत पेट्रोलियम कंपन्यांकडे बोट का दाखवता? सरकार म्हणून द्या दणका या कंपन्यांना.

केवळ शब्दांचे बुडबुडे

शिवसेनेने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर स्थिर आहेत, तुमचा तोटाही भरून निघाला आहे, तरीही इंधन दरकपात का करीत नाही, असा दम भरा आणि इंधनाचे दर कमी करायला भाग पाडा. जनतेला थेट दिलासा द्या. त्याऐवजी शब्दांचे बुडबुडे का उडवीत आहात? अर्थात, पेट्रोलियम मंत्री तरी काय करणार? ते ज्या सरकारमध्ये आहेत ते सरकार ‘बनवाबनवी’ आणि ‘जुमलेबाजी’ याशिवाय दुसरे काय करीत आहे? महागाई असो की दरडोई उत्पन्नवाढ, शेतकरी असो की बेरोजगार, गरीब असो की मध्यमवर्गीय, धोरण आर्थिक असो की संरक्षणविषयक, मागील आठ वर्षांपासून देशात हवेतली तलवारबाजी आणि जुमलेबाजीच सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...