आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आणि अनेक शहरांमध्ये शंभरी ओलांडलेल्या पेट्रोल-डीझेलच्या भावांवरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. राम मंदिरासाठी चंदा गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यापेक्षा वाढत्या पेट्रोल आणि डीझेलच्या किमती कमी करा. यातून किमान राम भक्तांच्या चुली तरी पेटतील आणि श्रीरामही खुश होतील. लोकांनी वाहने घेतली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने एकेदिवशी त्यांना रस्त्यावर सोडून घरी जावे लागेल. मग बोंबलत बसा असा टोला शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून लगावला आहे.
भाजप मूग गिळून गप्प
शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधताना म्हटले, वाढत्या महागाईवर देशातील सत्ताधारी पक्ष भाजप मूग गिळून गप्प बसला आहे. तिकडे केंद्रातील भाजप सरकार सोनार बांग्ला घडवण्यासाठी कोलकात्यात प्रचारासाठी ठाण मांडून आहे, आणि इकडे सामान्य लोक महागाईला तोंड देत आहेत. एरवी महाराष्ट्रात उठसूट आंदोलने करणारा भाजप आता पेट्रोल आणि डीझेलच्या महागाईवर काही बोलणार नाही का? असा सवाल शिवसेनेने केला.
मोदींच्या बोलघेवडेपणाला साष्टांग दंडवत
कोल्हापूरच्या एका पेट्रोल पंप मालकाने नुकतेच एक फलक लावले होते. त्यात पेट्रोल आणि डीझेलच्या किमती पाहून छातीत कळ आल्यास मालक जबाबदार नाही असे लिहिले होते. असेच वातावरण सध्या देशभर आहे. भाजपच्या लोकांनी तर जल्लोष करावा कारण पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. तरीही 'प्रिय मोदीजी' या शंभरीचे श्रेय स्वतः न घेता काँग्रेसला द्यायला तयार आहेत. आधीच्या सरकारांनी देशाचे तेल आयतीवरील अवलंबत्व कमी केले असते तर ही अवस्था झाली नसती असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. मोदींची हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या बोलघेवडेपणाला साष्टांग दंडवत घालावे असेच आहे.
आधीच्या सरकारने इंडियन ऑइल, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई हायसारखे सार्वजनिक उपक्रम सुरू केले. समुद्रातून तेल साठे शोधून काढले. आणि मोदी सरकारने सरकारी कंपन्या विक्रीला काढल्या. 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल 101 डॉलर होत्या. त्यावेळी पेट्रोल प्रति लिटर 71 रुपयांना आणि डीझेल 58 रुपयांना विकले जात होते. आता फेब्रुवारी 2021 मध्ये तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रति बॅरल किमती 62 डॉलर असताना पेट्रोलने शंभरी गाठली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.