आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षाचा निधी सध्या ठाकरे गटाकडे आहे. शिंदे गटाच्या हातात हा पक्षनिधी जाऊ नये, यासाठी ठाकरे गट हा निधी इतरत्र वळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षनिधीच्या वापरावर स्टे आणावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
शिंदे गटाकडून याचिका नाही
वकील आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली असून पक्षनिधीसोबतच शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा व मालमत्ता गोठवाव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. तसेच, आपण ही याचिका शिंदे गटाकडून दाखल केलेली नाही. तर, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याचेही आशिष गिरी यांनी स्पष्ट केले.
पक्षनिधी इतरत्र जाऊ नये
वकील आशिष गिरी म्हणाले की, प्रसारमाध्यमांत ठाकरे गटाकडून शिवसेनेचा पक्षनिधी इतरत्र वळवण्यात येईल, असे वृत्त आहे. शिवसेनेचा हा पक्षनिधी इतरत्र जाऊ नये, यासाठी सुप्रीम कोर्टाने कोर्ट रिसिव्हर नियुक्त करुन ही मालमत्ता ताब्यात घ्यावी. हा पक्षनिधी इतरत्र जाऊ नये, एवढीच माझी भूमिका आहे. शिवसेना कुणाची?, यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ही संपत्ती उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंकडे सोपवावी.
अॅड. आशिष गिरी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत केवळ पक्षनिधीच नव्हे तर शिवसेना भवन व शिवसेनेच्या शाखांच्या वापरावरही स्टे आणावा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर शिवसेनेच्या अध्यक्षांकडे सर्व पक्षनिधी व मालमत्ता वर्ग करावे.
24 एप्रिलला सुनावणी घ्यावी
राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्याचवेळी या याचिकेवरही सुनावणी घ्यावी, अशी मागणी अॅड. आशिष गिरी यांनी केली आहे. आशिष गिरी म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचे सांगितल्यानंतर या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले आहेत. शिवसेनेच्या मालमत्तेशी निगडीत प्रकरण याच्याशीच संबंधित असल्याने आम्ही या प्रकरणाची 24 एप्रिललाच सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. याच कारणामुळे हायकोर्टात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात याचका दाखल केल्याचे अॅड. आशिष गिरी यांनी सांगितले.
मातोश्रीवर दावा नाही
उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसंबंधी आमचा कोणताही दावा नाही, असेही अॅड. आशिष गिरी यांनी सांगितले. आशिष गिरी म्हणाले की, मातोश्री ही रहिवासी मालमत्ता आहे. शिवसेना पक्षाशी त्याचा संबंध नाही. मात्र, शिवसेनेशी निगडीत सर्व संघटना त्यामध्ये शिवाई ट्रस्टचाही समावेश आहे, त्या सर्व संघटनांच्या मालमत्ता गोठवण्याची आमची मागणी आहे.
हेही वाचा,
गौप्यस्फोट:शिंदे गटाचे काही मंत्री, आमदार अयोध्या दौऱ्याला गैरहजर; बेदिलीची ठिणगी पडली - ठाकरे गटाचा मोठा दावा
शिंदे गटाचे काही मंत्री, आमदार व खासदार अयोध्या दौऱ्याला गेले नाहीत. त्यावरुन शिंदे गटात सरळ दोन गट पडले आहेत व उद्याच्या बेदिलीची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आले आहे. तर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही शिंदे गटात काहीतरी गडबड सुरू आहे. लवकरच ही गडबड बाहेर येईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिंदे गटाचे काही आमदार व खासदार का अनुपस्थित राहिले, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.