आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांतराचे राजकारण:औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना-काँग्रेस आमनेसामने, वादात भाजपचीही उडी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अल्पसंख्याक मुस्लिम समाज ही मतपेटी दूर जाईल, अशी काँग्रेसला भीती : राऊत

औरंगाबाद शहराच्या नामांतरप्रकरणी राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीत जोरदार सामना रंगला आहे. रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रात नामांतराचे समर्थन केले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आक्रमक झाले. “राज्यात हे दोघे मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?’ असा सवाल त्यांनी केला. राऊत यांनी म्हटले होते की, हिंदुस्थानची घटना धर्मनिरपेक्ष आहे. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना धर्मनिरपेक्ष कसे मानावे? औरंगजेबाने शीख, हिंदूंचा छळ केला. त्यांच्या खुणा आपण का जतन करायच्या?

दुसरीकडे काँग्रेससारखे ‘धर्मनिरपेक्ष’ पक्ष औरंगाबादचे “संभाजीनगर’ होऊ नये या मताचे आहेत. स्वत:च्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी काँग्रेसला चिंता आहे. तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाज ही मतपेटी दूर जाईल, अशी काँग्रेसला भीती असल्याचे नमूद करत राऊत यांनी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेला आव्हान दिले आहे.

वादात भाजपचीही उडी
या वादात आता भाजपनेही उडी घेतली आहे. भाजप आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले, इतर वेळी अस्मितेची भाषा करणारी शिवसेना छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मात्र कोपरापासून दंडवत घालते आहे. सत्तेसाठी भाषा कशी बदलते, लाचारी कशी असते हे शिवसेनेने दाखवून दिले आहे.

हे वागणे सेक्युलर नव्हे : राऊत
औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाही तर इतिहासाचा भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत. हे वागणे सेक्युलर नव्हे!

हा शिळ्या कढीला ऊत : बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, शिवसेनेला मतांची चिंता असल्यानेच औरंगाबाद नामांतरावरून त्यांचा ‘सामना’ सुरू आहे. शिळ्या कढीला ऊत आणून ते स्वार्थ साधू इच्छित आहेत. हा ढोंगीपणा आहे. केंद्रात आणि राज्यात हे दोघे मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते. तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनी औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे, असे आव्हान थोरात यांनी दिले. भाजपवरही त्यांनी टीका केली. ढोंगीपणा हे भाजपचे स्वभाववैशिष्ट्य आहे. त्यामुळे भाजपच्या कृतीकडे जनता करमणूक म्हणून बघते, असा दावा थोरात यांनी केला.

छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत
आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. आमच्या आदर्शांचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही. कुणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बजावले.

बातम्या आणखी आहेत...