आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामित्रपक्षाचे पालकमंत्री आमची कामे करतो म्हणतात, पण करत काही नाहीत. आमची कामे होत नाहीत. मग तुम्हीच सांगा, मतदारसंघ कसा बांधायचा अन् आपला पक्ष तरी कसा वाढवायचा, असा सवाल २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच विचारला. पाच तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांनी शिवसेना-काँग्रेसचे मंत्री, पालकमंत्री यांच्या तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. या वेळी तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करून यावर मार्ग काढतील, असा दिलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, मंत्री व खासदार व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची प्रदीर्घ बैठक बुधवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. त्यात बहुतांश उमेदवारांनी काँग्रेस व शिवसेनेचे पालकमंत्री कामे करत नसल्याबाबत तक्रार केली. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केला. “आपले आघाडी सरकार आहे, त्यामुळे कामे मार्गी लागण्यास अडचणी नक्की आहेत. मात्र त्यावर तिन्ही पक्षांचे नेते बसून मार्ग काढतील,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले पवार...
पराभूतांच्या तक्रारी; कोविड सेंटर पळवले
जनता दरबार पुन्हा सुरू करा
राष्ट्रवादी मंत्र्यांचे मुंबई प्रदेश कार्यालयातील जनता दरबार बंद पडले. गणेशोत्सवानंतर ते पुन्हा सुरू करा. तसेच त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी जनता दरबार घ्यावेत.
केंद्राविरोधात आंदोलने करा
केंद्र सरकारने अनेक अन्यायकारी निर्णयांचा सपाटा लावला आहे. महागाई, इंधन दरवाढ असे अनेक प्रश्न आज उग्र झाले आहेत. त्यांवर राष्ट्रवादीने आंदोलने करावीत.
पाच तास बैठक; ५५ उमेदवारांना संधी
बैठकीस २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील सर्व ११४ उमेदवार उपस्थित होते. सकाळी ९ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी २ पर्यंत अशी ५ तास चालली. या बैठकीत ५५ उमेदवारांना बोलण्याची संधी मिळाली. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघातील परिस्थिती या वेळी सांगितली.
घड्याळास चांगले दिवस
मतदारसंघात ‘घड्याळा’ला वातावरण चांगले आहे, मात्र स्था. स्व. संस्थांच्या निवडणुकांत आघाडी झाल्यास कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नाही असे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यावर आघाडीचा निर्णय परिस्थितीनुसार घेऊ, असे पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.