आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे!:स्वातंत्र्य, लोकशाहीची पदोपदी पायमल्ली; सरकारवर टीका करत ठाकरेंचे बाबासाहेबांना अभिवादन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही, नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला. आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.

लोकशाही मूल्यावरच प्रहार

ठाकरेंचे मुखपत्र सामनात आज म्हटले आहे की, न्यायालये, वृत्तपत्रे, निवडणूक आयोग, संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत. अनेक प्रकरणांत कायदे स्वस्थ बसत आहेत. देशात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतला तो पहिला धडा असतो; परंतु आजच्या सरकारने लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केला आहे. देशाच्या एकसंधतेला तडे जातील असे हे धोरण आहे.

अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय. लोकशाही, स्वातंत्र्य जेव्हा जेव्हा संकटात येईल त्या त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे स्मरण करावेच लागेल. आम्ही आमच्या तमाम शिवसैनिकांतर्फे ते करीत आहोत, अशा शब्दांत सरकारवर टीका करत ठाकरेंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे.

महाराष्ट्राचे दौनच दैवत

ठाकरेंनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. या महामानवास आज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्या अनुयायांचा महासागर उसळेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगत, ‘महाराष्ट्राची दोनच दैवते खरी. पहिले शिवाजी महाराज व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’ मात्र या दोन्ही दैवतांचा आज राजकारणापुरता वापर करण्याचे तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे.

... म्हणून बाबासाहेबांची आठवण येते

ठाकरे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यात लोकशाही, स्वातंत्र्य सगळेच आले. लोकशाहीमध्ये बहुमतवाल्यांच्या शासनाला विरोधकांची गर्भित व उघड संमती आवश्यक असते. म्हणूनच विरोधकांचा आवाज बंद पाडून तुम्ही त्यांना नष्ट करू शकत नाही. ख्यातनाम ब्रिटिश विचारवंत हेरॉल्ड लास्की म्हणतात, ‘आपल्या समर्थकांच्या स्तुतीपेक्षा टीकेतून सरकार अधिक शहाणे होत असते.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेने हे सर्व अधिकार व स्वातंत्र्य आपल्याला दिले. पण त्याच घटनेचे अवमूल्यन आज केले जात आहे व घटनेने दिलेल्या स्वातंत्र्यास पायदळी तुडवले जात आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. एका महान उदात्त हेतूने बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार केली. पण ती अंमलबजावणीसाठी चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर नुकसान होईल, असाही डॉ. आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिला होता. आज त्यांची आठवण येते.

दगडांना देवत्व प्राप्त झाले

ठाकरे म्हणाले की, ‘या देशात दगडाला शेंदूर लावणे सोपे आहे, पण नंतर तो खरवडून काढणे कठीण आहे’, असे आंबेडकर म्हणाले होते. आज अनेक शेंदूर फासलेल्या दगडांना देवत्व प्राप्त झाले. त्यांच्याकडे पाहून डॉ. आंबेडकरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य राष्ट्राने आपल्या डोक्यावर धारण केले आहे. पण आज सत्य औषधापुरते नव्हे, तर औषधालाही मिळत नाही. नफेखोरांचेच राज्य चालले आहे व जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही. म्हणून डॉ. आंबेडकरांची आठवण जनतेला रोजच येत आहे.

बाबासाहेबांची शिकस्त

ठाकरे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी घटनेद्वारा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक विचारत्रिमूर्तीची 1950 साली प्रतिष्ठापना करून अस्पृश्यता हा गुन्हा ठरवीत 1956 मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन मानवतेला मुकलेल्या माणसाला अस्मिता बहाल केली. स्वतःचे व्यक्तित्त्व दिले. हा संपूर्ण लढा त्यांनी देशहिताला यत्किंचितही धक्का लागू न देता लढवला. समाजाचा एक फार मोठा विभाग विकलांग असेल तर समाज सशक्त होऊच शकत नाही, असे त्यांनी वारंवार बजावले. प्रकृती खालावली असतानाही त्यांनी प्रचंड परिश्रम करून हिंदू कोड बिल तयार केले आणि हिंदूंना एक हजार वर्षांपूर्वीच्या पुराणकाळ जमान्यातून आधुनिक एकविसाव्या शतकात आणणारी संहिता दिली. त्यांनी समान नागरी कायद्याचाही आग्रह धरला. अशा प्रकारे सारे राष्ट्रच एकसंध व समर्थ करण्यासाठी जितकी शिकस्त करता येईल तितकी त्यांनी केली.

देशाचा मी मालक, ही शिकवण

ठाकरे म्हणाले, बाबासाहेब कमालीचे स्वाभिमानी होते. धार्मिक – सामाजिक आघाडीवर हिंदू कोड बिल तसेच राजकीय आघाडीवर नियोजनामार्फत समाजवादी समाजरचना या त्यांच्या प्रयत्नांवर पाणी पडताच त्यांनी केंद्रातले मंत्रिपद फेकून दिले. देश आणि दलित यात दुरावा निर्माण करण्याचे सोडाच, पण हा देश माझा असून या देशाचा मी मालक ही शिकवण त्यांनी जनतेत बिंबवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते होते असा अपप्रचार जे करतात ते मूर्ख आहेत. डॉ. आंबेडकर हे संपूर्ण देशाचे मार्गदर्शक व नेते होते. त्यांची जातीयतेविरुद्धची लढाई समर्थ देशासाठी होती. पण जातीयवाद सत्ताधाऱ्यांच्या रोमारोमांत भिनलेला आहे.

बाबासाहेबांनी इस्लामचा स्वीकार केला नाही

ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदी काशीला गेले. त्यांनी गंगेत डुबकी मारली व किनाऱ्यावरील तंबूत पाच दलितांचे पाय धुतले. अशाने काय जातीयता नष्ट होणार आहे? डॉ. आंबेडकरांची आठवण अशा वेळी येथे येतच राहील. डॉ. आंबेडकरांनी 1933 सालीच सांगून टाकले होते की, मी हिंदू धर्माचा त्याग करीन हे नक्की आणि इस्लामचा स्वीकार करणार नाही हेदेखील नक्की! पाकिस्तानने अनेक प्रलोभने दाखवूनही त्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही. हे त्यांचे राष्ट्रावर व हिंदू धर्मावर उपकार आहेत. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही, कारण इस्लाम धर्मात परिवर्तनशीलता नाही. त्यात कुराणाचा शब्द अखेरचा आहे. ज्यात अक्षराने बदल करता येत नाही. डॉ. आंबेडकरांना हे मान्य नव्हते.

बातम्या आणखी आहेत...