आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीवरून राजकारण:'हर हर मोदी'नंतर भाजपकडून 'हर हर ईडी, घर घर ईडी'च्या घोषणा, भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर शिवसेनेची टीका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबधित 11 कोटी 15 लाखांच्या मालमत्ता काल जप्त केल्या. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचे अलिबागमधील 8 भूखंड आणि दादरमधील एका फ्लॅटवर सील ठोकत ईडीने काल महाविकास आघाडीला चांगलाच दणका दिला. त्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून ईडी कारवायांवरून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. नेत्यांसोबतच मतदारांमागेही ईडी लावण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वी दिला होता. त्यावरून 'हर हर मोदी, घर घर मोदी' या घोषणेस जोडून कोणी 'हर हर ईडी, घर घर ईडी,' अशी घोषणा देत असेल तर आता लोकांना बंड करावेच लागेल, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

चंद्रकांत पाटलांच्या बदललेल्या भूमिकेमुळे आश्चर्य!
भाजपचे डोके सुपीक आहे. मात्र, महाराष्ट्राची मती व माती वांझ नाही. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करायचाच असे भाजपने ठरविलेले दिसते. काँग्रेस आमदाराच्या आकस्मिक निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. लोकशाही मार्गाने निवडणुकीचा जो निकाल लागायचा तो लागेल, पण भाजपच्या प्रांतिक अध्यक्षांनी कोल्हापूरच्या मतदारांना सरळ सरळ धमकावले आहे की, भाजपास मतदान झाले नाही तर तुमच्या मागे 'ईडी' चा ससेमिरा लावू. भारतीय जनता पक्ष हा जणू सोवळे नेसूनच राजकारण करीत असल्याने निवडणुकीत पैसे वाटप, दाबदबाव अशा पापकर्मांची त्यांना लाज वाटते. पण निवडणुकीतील लक्ष्मीपूजनाबाबत व लक्ष्मीदर्शनाबाबत भाजप पुढाऱ्यांची दिलदार वक्तव्ये पाहिल्यावर चंद्रकांत पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेचे आश्चर्य वाटते, असे अग्रलेखात म्हटले आहे.

रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याची करून दिली आठवण
चंद्रकांत पाटलांच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे पैठण येथे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना म्हणाले होते, 'निवडणुकीच्या आधी एक दिवस लक्ष्मी घरी चालून आली तर तिला परत करू नका, उलट तिचे स्वागत करा!' या वक्तव्याची अग्रलेखात आठवन करून देत भाजपला निवडणुकीतील लक्ष्मीदर्शनाचे व लक्ष्मीपूजनाचे वावडे नाही. मग आताच चंद्रकांत पाटलांनी भूमिका का बदलली, असा सवालही शिवसेनेने केला आहे.

ईडी म्हणजे भाजपचा घरगडी!
ईडीची धमकी देत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या मतदारांना सरळ सरळ धमकावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे, 'ईडी म्हणजे भाजपचे घरगडी!' हे विधान सत्य करून दाखविणारे वक्तव्य भाजप प्रांताध्यक्षांनी केले आहे. ऊठसूट ईडी, सीबीआयच्या नावाने धमक्या द्यायचे हे जे वेड महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना लागले आहे ते त्यांच्या मानसिक प्रकृतीबाबत चिंता वाटावी असे आहे, असा टोलादेखील या अग्रलेखात हाणला आहे.

ब्लॅकमेलिंगचे हे उद्योग केंद्रीय गृहमंत्र्यांना मान्य आहे का?
अमरावतीचे भाजप समर्थक आमदार राणा यांनीही तेथील पोलीसप्रमुख आरती सिंह यांना ईडी व सीबीआयच्या माध्यमातून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य मोडायचे, प्रशासकीय, पोलीस अधिकाऱ्यांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ब्लॅकमेल करायचे हे उद्योग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मान्य आहेत काय? आता ही घसरगुंडी इतक्या खालच्या पातळीवर गेली की, थेट मतदारांनाच ईडीच्या नावाने धमक्या देण्यापर्यंत मजल गेली. भारतीय जनता पक्षाचेच बहुधा असे म्हणणे असावे की, भारतीय जनता पक्षाकडून होणाऱ्या लक्ष्मीदर्शनाचा लाभ जरूर घ्या, पण दुसऱ्यांच्या राजकीय सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद घ्याल तर याद राखा, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

कोल्हापूरचा नाद करायचा नाही!
कोल्हापूरचा नाद करायचा नाही, अशी परंपरा आहे. कोल्हापूरची जनता स्वच्छ अशा पुरोगामी विचारांची आहेच, पण राष्ट्रीय बाण्याचा हिंदुत्ववाद, निर्भयपणा त्यांच्या रक्तात आहे. कोल्हापुरातील कुस्तीगीरांनी भल्या भल्यांना अस्मान दाखवले आहे हे काय भाजपच्या नकली हिंदुत्ववाद्यांना माहीत नसावे? ज्यांना कोल्हापूर कळले नाही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लुडबुड करू नये आणि कोणी अशी करत असेल तर त्यांना कोल्हापूरची मर्दमऱ्हाटी जनता अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेने हाणला आहे.

बातम्या आणखी आहेत...