आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या मानगुटीवर 40 पिंपळांवरचा मुंजा:शिवसेनेची शिंदे सरकारवर तुफान टीका; राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एक गट बारा भनगडींचा मॅटिनी शो सुरू झाल्याची तिखट टीका शिवसेनेने मंगळवारी आपल्या मुखपत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना केली आहे. महाराष्ट्राच्या नशिबी सध्या जे भोग आले आहेत, त्यातून मार्ग कसा काढावा या विवंचनेत मऱ्हाटी जनता आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

ईडी-पिडी बळाचा वापर करुन राज्याच्या मानगुटीवर चाळीस पिंपळांचा मुंजा बसविला. त्यामुळे सकाळी उठून पाहिल्यानंतर राज्यात रोज एक नवी भागनड झालेली दिसते. या भानगडचींचा शिवसेनेचा संबंध नाही. 38 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले. त्यानंतरही खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागेल. खातेवाटपही अगदी नमुणेदार झाल्याने शिंदे गटात त्यावरून एखाद्या भानगडीची ठिणगी न पडली तर नवलच, असे सेनेने म्हटले आहे.

भाजपने हाती भोपळाच दिला

नगरविकासचे मलिदा खाते सोडले तर शिंदे गटाच्या हाती भाजपने भोपाळाच दिला आहे. संपूर्ण प्रमुख खाती फडणवीस व त्यांच्या लोकांच्या मुठीत आहेत. त्यामुळे नाक मुठीत धरूनच त्या 50 जणांना फडणवीसांकडे जावे लागेल. पण खोक्यांखाली स्वाभिमान चिरडून गेला असल्याने ते हे सर्व सहन करतील, असे मुखपत्राने म्हटले आहे.

शिरसाट, केसरकरांवर निशाणा

शिंदे म्हणून राज्यात जो काही एक गट निर्माण झाल, त्यातील काही लोकांना मंत्रिपदे मिळाली. यावर बाकीच्यांनी तत्काळ नाराजी व्यक्त करून मंत्रिपदाच्या इच्छा जाहीर केल्या. शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली. मला कॅबिनेट मंत्रीपद व औरंगाबादचे पालक मंत्रिपद हवे म्हणजे हवेच. काल-परवा आलेल्या टोपी फिरवू दीपक केसरकरांना मंत्रीपद मिळते. मग आम्हाला का नाही? असे ते म्हणाले. त्यावर केसरकर हपापाचा माल वाटपाचे मालक असल्यासारखे शिरसाटांनाही पुढच्या विस्तारात नक्कीच मंत्रीपद मिळेल, असे आश्वासन देतात.

केसरकर, सामंत यांच्यासारखे अनेक राजकीय बाहेरख्याली कधी इथे तर कधी तिथे व कुठेच जमले नाही तर शिंदे गटाच्या गुळास जाऊन चिकटत असतात. त्यामुळे शिरसाट-गोगावले अशा निष्ठावंतांचे वांधेच झाले म्हणायचे, असेही शिवसेनेने आपल्या मुखपत्राच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो

शिवसैनिक स्वाभिमानाची मीठ-भाकरी खातो, पण महाराष्ट्राशी बेइमानी करणार नाही. भाजपला मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवायचा आहे. मराठी माणसाला गुलाम-लाचार करून मुंबई गिळायची आहे व त्याकामी शिंदे गटाची भानगड त्यांनी निर्माण केली. ही बाब गंभीर आहे. शिंदे गटाच्या भानगडीस संजय शिरसाट यांनी तोंड फोडले. ‘ह्योच नवरा पायजे’च्या तालावर ते म्हणाले, ‘‘मंत्रीपद आता हवेच.’’

पन्नास जणांना हवे म्हणजे हवेच. चला, या निमित्ताने एक जळजळीत सत्य बाहेर आले. शिंदे गटाने शिवसेना सोडताना स्वाभिमान, हिंदुत्व वगैरेंचा जो मुद्दा समोर आणला तो सपशेल झूठ आहे. जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति-शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति-शपथविधी करू शकतील काय? राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे?, असा शाब्दिक चिमटाही शिवसेनेनं शिंदे गटाला काढला आहे.

संजय शिरसाट बावचळले

शिरसाट या भानगडीत इतके बावचळले की, त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर उद्धव ठाकरे हेच कुटुंबप्रमुख असल्याचे जाहीर केले व नंतर सारवासारव करीत हा आमचा टेक्निकल लोचा असल्याचे सांगितले. मात्र शिरसाट यांनी शिंदे यांच्या गटातील ५० जणांची ‘खदखद’च एकप्रकारे व्यक्त केली. प्रत्येकाला काही ना काही तरी मिळायलाच हवे अशी शिंदे गटातील सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आता या पन्नास जणांना काही ना काही हवे म्हणजे काय? फूल ना फुलाची पाकळी तरी म्हणे आपल्याला मिळावी, असे ते म्हणत आहेत. मग आता यातील फुले कोणास? पाकळी कोणाला व उरलेले काटे कोणाला मिळणार? हे प्रश्न आहेतच, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

अबलेच्या किंकाळ्यांना विचारतेय कोण?

संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले, तेथे या पन्नास जणांना ‘खोकी खोकी’ भरून मध तर आधीच मिळाला आहे, पण नुसती मधात बोटे बुडवून आणि चाटून काय होणार? आता मंत्रीपद हवेच. निदान महामंडळांचा बार तरी उडवाच. नाही तर या क्रांतीचा फायदा नाही, असे शिंदे गटाचे लोक उघडपणे बोलू लागले. पुन्हा ही पहिल्या विस्तारानंतरची भानगड आहे. दुसऱ्या विस्तारानंतर शिंदेंच्या गावात व गटात रोज बारा भानगडींना तोंड फुटेल व प्रत्येक भानगडबाजास खोकीवाटप करताना केस-दाढी गळून जाईल. शिंदे गटाचे मंत्री जिथे जातील तिथे निदर्शने होत आहेत. संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले. तेथे ट्रकभर फुले त्यांच्यावर उधळण्यात आली. त्या प्रत्येक फुलाच्या पाकळीतून पुण्याच्या ‘निर्भया’ची किंकाळीच ऐकू येत असावी. पण सरकारच जर बारा भानगडी व लफडी करून आले असेल तर त्या अबलेच्या किंकाळ्यांना विचारतेय कोण?, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

प्रति शिवसेना भवनावरूनही निशाणा

आताच तुमच्या गटातील भानगडींना तोंड देताना तुमच्या तोंडाला फेस येत आहे. त्यात प्रति-शिवसेना भवनातील नव्या भानगडींचे निवारण करण्याची नसती आफत सांभाळता सांभाळता तुम्हाला मुश्कील व्हायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अस्सल स्वाभिमानी मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे संघटन शिवसेनेच्या रूपात उभारले. 56 वर्षांनंतरही या संघटनेचा पाया व कळस भक्कम आणि तितकाच अजेय आहे. अनेक लाटा, तडाखे, विश्वासघातकी वावटळींना तोंड देत शिवसेना भवन उभे आहे. ही इमारत नसून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग आहे तो! बारा भानगडीतून निर्माण झालेला हा अड्डा नसून ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचे अभेद्य कवच आहे, हे गटा-तटाच्या भानगडबाज लोकांनी ध्यानात ठेवावे, असेही शिवसेनेने ठणकावले आहे.

बातम्या आणखी आहेत...