आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना आणि दसरा मेळाव्याचा जन्म एकाच वर्षी झाला. पहिला दसरा मेळावा 56 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 1966 मध्ये झाला. खरे तर त्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी दसरा होता, पण काही कारणामुळे हा मेळावा 30 ऑक्टोबरला घेण्यात आला.
शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची जाहिरात 'मार्मिक' या नियतकालिकामधून करण्यात आली होती. या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मेळाव्याला जवळपास पाच लाख लोक उपस्थित होते.
शिवसेना कशी जन्मली?
शिवसेनेच्या जन्माची कहाणी अतिशय रोचकय. बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळी मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाची यादी मार्मिकमधून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. हे प्रबोधनकरांनी पाहिले. ते म्हणाले, ‘याला काही संघटनात्मक आकार देणार की नाही?’ याच प्रश्नातून मराठी माणूस आणि हिंदुत्व घेऊन शिवसेना जन्माला आली. 19 जून 1966 रोजी या नव्या संघटनेचा जन्म झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचे ते ‘शिवसेनाप्रमुख’ झाले. त्यानंतर 4 महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांनी शिवाजी पार्कवर पहिला मेळावा घेतला. त्यावेळीही 5 लाख जणांनी गर्दी केली. अन् बाळासाहेब नावानं मुंबईकरांनी, मराठी माणसांवर आपल्या वक्तृत्वाने एक गारूड केले.
ससेहोलपट थांबण्यासाठी...
शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याचा मजकूर 'मार्मिक'मध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, रविवार 30 ऑक्टोबर, सायंकाळी 5:30 वाजता शिवाजी पार्कवर शिवसेनेचा भव्य मेळावा आहे, तोच दसरा मेळावा होय. स्वतःच्याच राज्यात स्वतःची चाललेली ससेहोलपट थांबवण्यासाठी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने या मेळाव्यास जातीने उपस्थित राहिलेच पाहिजे. पिचक्या पाठीच्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊ नये. जय महाराष्ट्र, असे आवाहनही 'मार्मिक'मधून केले होते.
टॅक्सीवरून भाषण ठोकले
'मार्मिक'मध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एक व्यंगचित्रही प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यातही असा उल्लेख होता की, अपेक्षाभंग, अन्याय, उपऱ्यांचा धुमाकूळ, पीछेहाट या सर्वांमध्ये बुडणाऱ्या मराठी माणसाला शिवसेना मदतीचा हात देत आहे. पहिल्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यासोबत सुभाष देसाईंसह शिवसेनेचे काही मोजके नेते सोबत होते. विशेष म्हणजे या सभेत पांढरा शर्ट-पँट घालून बाळासाहेब आलेले. त्यांनी टॅक्सीवरूनच या मेळाव्यात भाषण केले.
अशी केली वर्गणी
शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्या काळी शिवाजी पार्कच्या भोवताली नारळाची झाडे होती. अतिशय शांत असलेल्या या मैदानावर बाळासाहेबांची तोफ धडाडली.अन् या मेळाव्याने एक इतिहास रचला. शिवसेनेच्या या पहिल्या दसऱ्या मेळाव्यातच पक्षासाठी वर्गणी गोळा करण्यात आली होती. मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये स्टीलचा डबा फिरवण्यात आला. मेळाव्याला आलेल्यांनी यथाशक्ती जसे जमेल तसे पैसे या डब्यात टाकले.
कोरोना अन् पावसाचे विघ्न
शिवसेनेच्या आजवरच्या 56 वर्षांच्या इतिहासात जवळपास सहा वेळेस दसरा मेळावा झाला नाही. 25 ऑक्टोबर 1974 चा शिवसेनेचा दसरा मेळावा पावसामुळे लवकर संपवावा लागला. 1990 आणि 1992 मध्येही पावसामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला, तर 2006 मध्येही पावसामुळे दसरा मेळावा रद्द करण्यात आला. त्यानंतर कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये दसरा मेळावा झाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.