आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना विरुद्ध भाजप:'मर्सिडीझ बेबी' असा उल्लेख करणाऱ्या फडणवीसांचा आदित्य ठाकरेंनी घेतला समाचार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुत्वानंतर आता बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आले आहेत. बाबरीचा ढाचा कुणी पाडला यावरून दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. याप्रकरणी सुरू झालेल्या लढाईत कलगीतुरा रंगताना बघायला मिळतो आहे. फडणवीस 1857 च्या उठावातही असतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सिडीझ बेबींना ना कधी संघर्ष करावा लागला आहे, ना कधी संघर्ष पाहिला आहे, असा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रत्त्युतर दिले होते. यावर पुन्हा आदित्य ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मर्सिडीज गाडीचा शोध मी लावला किंवा मर्सिडीझ मीच तयार केली, असा दावा तरी किमान मी केला नाही, अशी खोचक टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. गेल्या जन्मात 1857 च्या युद्धामध्ये मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढत असेल आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण, इतिहासाचा थोडा अभ्यास केला तर कळेल की, इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या किंवा तेथे सरकार पडलंय, असे कधी झाले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मागच्या जन्मात कोणाच्या बाजूने होते, हे माहिती नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

इतिहासावर भांडून आपल्या काय मिळणार -

देशात अनेक प्रश्न असताना त्यावर कोणी भाष्य करत नाही. केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. इतिहासावर भांडून आपल्या काय मिळणार आहे. एक देश म्हणून आपल्याला पुढे जायचे असेल तर सध्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. स्वत:चे राजकीय पुनरुज्जीवन करण्याची किंवा सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण त्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन होत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?

बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथे हजर होतो, एकही शिवसैनिक नेता तिथे हजर नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर 1857 च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं योगदान असेल असे म्हणत मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरेच्या टोमण्याला खोचक उत्तर दिले होते. 'सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीझ बेबी आहेत... त्यांना न संघर्ष करावा लागलाय, ना त्यांनी तो पाहिला आहे.''त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात. पण आमच्यासारखे हजारो नाही लाखो कारसेवक बाबरी ढाचा पाडला तेव्हा तिथे होते. आम्हाला त्याचा अभिमान आहे, असे म्हणत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.

1857 च्या लढ्यात मी असेन तर तात्या टोपे -

तसेच पुढे ते म्हणाले होते, की बाबरी ढाचा पाडला तेव्हा मी स्वतः तिथे होतो. त्यावेळी मी नगरसेवक होतो. मला असे वाटते की ते 1857 चे जे ते म्हणाले त्याबद्दल सांगेन. मी हिंदू आहे त्यामुळे माझा मागचा जन्मावरही विश्वास आहे आणि पुनर्जन्मावरही विश्वास आहे. त्यामुळे मागच्या जन्मात मी असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन, आणि तुम्ही असाल तर तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल. कारण आता तुम्ही युती अशा लोकांशी केली आहे जे 1857 ला स्वातंत्र्ययुद्ध मानत नाहीत. ते या उठावाला शिपायचं बंड म्हणतात. त्यामुळे ठीक आहे जे बोलायचे ते बोलू द्या, असे म्हणत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या टिकेला उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...