आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज गांधी मार्केट तसेच हिंदमाता येथील अंडरग्राऊंड वॉटर टॅंक कामांची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधक तसेच बंडखोर आमदार करत असलेल्या टिकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही जनतेच्या कामात व्यस्त आहोत आणि ते राजकारणात व्यस्त आहेत.
केसरकरांवर टीका
यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, तीन पक्ष बदलून झालेले आणि चौथ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा याचा आपण विचार करायला हवा. गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न करताहेत. बंडखोरीबाबत अनेक कारणे देत आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यत यांचे कारण बदललेले असते. कोणाला ही गद्दारी पटलेली नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. विषय बदलत राहायचे, गोलपोस्ट बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा प्रयत्न सुरू आहे. आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा. सर्कसमध्ये काय बोलायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. लोकांचा विश्वास चांगल्या माणसावर आहे, उद्धव ठाकरेंवर आहे. आम्ही प्रेम आणि विश्वास यांच्यावर ठेवला आणि तो यांनी मोडला याचं दुःख आम्हाला आहे. गोलपोस्ट बदलत राहतील आणि त्यांच्या गोलपोस्टवर आम्ही गोल मारणं हे योग्य वाटत नाही. आतापर्यंत जी कारणं दिलीत त्याचा आढावा घ्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
न्याय व्यवस्थेवर विश्वास
आदित्य ठाकरे यांनी आरेबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केलं. आदित्य म्हणाले, आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. 806 एकर जंगल म्हणून आरेची जागा घोषित केली होती. केवळ झाडांचा विषय नाही. तिथे 5-6 वाघ आहेत, कांजूर मार्गला आम्ही सगळे डेपो हलवले होते. 8 ते 9 हजार कोटी वाचवले असते. चारही लाईनचं एकाच ठिकाणी काम झालं तर जमिनीची किंमत कमी होईल, जनतेचे पैसे वाचवू.
तेजस ठाकरे राजकारणात?
आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांच्या राजकीय एन्ट्रीवर भाष्य करत याबाबत सुरू असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या. या चर्चेवर विश्वास ठेवू नका. त्याला जेव्हा यायचं तेव्हा तो ठरवेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईवर आमचे लक्ष
दरम्यान, आज पाहणी दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी इन्फिनिटी स्कल्पचर सुशोभीकरण आणि वरळीतील नरेश पाटील चौक सुशोभीकरणाचं उद्घाटन केलं. कोस्टल रोडच्या कामाचीही पाहणी केली. हाजीअली येथे टनेलमध्ये जाऊन कशा पद्धतीने काम सुरू आहे याची पाहणी केली. यावेळी आमचं लक्ष मुंबई आणि मुंबईकरांच्या सुख सोयींवर आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
यंदा पाणी तुंबले नाही
आदित्य ठाकरे म्हणाले, गांधी मार्केटला गेलो, अनेक वर्षे हिंदमाता येथे मीडिया यायचा, आम्ही यायचो, कधी कधी छातीपर्यंत पाणी भरलेलं असायचं, गुडघ्यापर्यंत पाणी असायचं. तेव्हा प्रश्न विचारला जायचा की हे किती दिवस चालणार. सतत कारणं देऊन चालणार नाही, यावर तोडगा काढणं महत्वाचं होतं. त्यावेळी गांधी मार्केटच्या इथे पंप लावले आहेत. हिंदमाता येथे सेंट झेविअर्सचं मैदान होतं तिथे दोन मोठे अंडर होल्डिंग टॅन्कस केले. प्रत्येक महिन्यात येऊन याचा पाठपुरावा केलेला आहे. यावेळी येण्याची गरज भासली नाही कारण पाणी तुंबलं नाही याचा आनंद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.