आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आघाडी सरकारवर सातत्याने टीका करताना दिसते. मात्र गेल्या काही दिवसांपासून यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच रंगल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर सतत विविध आरोप करताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटील देखील सातत्याने आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या सदरातून विरोधीपक्षाचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा ही लोकशाहीची धोक्याची घंटा ठरत आहे असा टोला देशील राऊतांनी लगावला आहे.
शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?
'चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गमतीचेच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार? पण चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार? असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
सोमय्यांचे दौरे रोखू नये
'महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असं मला वाटतं.' असेही राऊत म्हणाले.
विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे
'राजकारण्यांकडून विविध पातळ्यांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे. किरीट सोमय्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते,'
भूमिका कमी व जळफळाटच जास्त
'ईडीच्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम. सार्वजनीक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावे लागते. सामनातील अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली व एक खरमरीत पत्र सामनास पाठवले. त्यात भूमिका कमी व जळफळाटच जास्त. त्या पत्रात चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी अपमानकारक, अब्रुनुकसानी करणारी विधाने करुनही ते प्रसिद्ध करण्याचे मोठेपण सामनाने दाखवले. पण लिहताना, बोलताना भान सुटले की स्वतःच्याच धोतरात पाय कसे अडकून पडतात ते या पत्रावरुन दिसते' असे म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या पत्रावर थेट उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का?
'करोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चं मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असं वाटतं. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असं मनोरंजन सुरू आहे' असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.